नवी दिल्ली : अमेरिकेत खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या एका गुप्तचर अधिकाऱ्याला भारताने अटक केली आहे. याबाबत भारताने अमेरिकेला माहिती दिली आहे. हा अधिकारी आता सेवेत नसल्याचे भारताने म्हटले आहे. तसेच, आरोपांनंतर स्थापन करण्यात आलेली उच्चस्तरीय चौकशी समिती त्या व्यक्तीच्या इतर संबंधांची चौकशी करत आहे. या संदर्भात भारतीय तपास पथकही अमेरिकेत जाऊन तपासाबाबत चर्चा करणार आहे, असे भारताने सांगितले आहे.
याआधी, अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने या अधिकाऱ्याची ओळख भारत सरकारचा सर्व्हिंग ऑफिसर म्हणून केली होती. जून २०२३ मध्ये न्यूयॉर्कमध्ये गुरपतवंत सिंग पन्नू यांच्या विरोधात कथित हत्येचा कट रचल्याचा आरोप या व्यक्तीवर ठेवण्यात आला होता. दरम्यान, गुरपतवंत सिंग पन्नू याला भारताने दहशतवादी घोषित केले आहे. गुरपतवंत सिंग पन्नू यांच्याकडे अमेरिकन नागरिकत्व आहे. या वर्षी एप्रिलमध्ये एका बातमीत वॉशिंग्टन पोस्टने या अधिकाऱ्याची ओळख विक्रम यादव अशी केली होती.
अमेरिकेने व्यक्त केला आनंद एचटीच्या रिपोर्टमध्ये एका अमेरिकन अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, भारताने उचललेल्या पावलांमुळे अमेरिका खूश आहे. या अधिकाऱ्याने सांगितले की, ही व्यक्ती आता सरकारी कर्मचारी नाही, यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळाले आहे. आम्हाला असेही सांगण्यात आले आहे की, त्याला स्थानिक आरोपांनुसार अटक करण्यात आली आहे. भारतीय तपास समिती वॉशिंग्टन डीसीला जाणार असून, येथील अधिकाऱ्यांचीही भेट घेणार आहे.
आरोप गांभीर्याने घेतलेभारत सरकारने हे आरोप गांभीर्याने घेतल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. दोन्ही सरकार जबाबदारी निश्चित करण्यासाठी किती गांभीर्याने प्रयत्न करत आहेत, हे या प्रकरणावरून दिसून येते. अधिकाऱ्याने पुष्टी केली की, अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) जेक सुलिवन आणि भारतीय NSA अजित डोवाल तसेच दोन्ही सरकारांच्या विविध स्तरावरील अधिकारी यांच्यात 'वारंवार' आणि सतत चर्चा होत आहे.
कोण आहे गुरपतवंत सिंग पन्नू?गुरपतवंत सिंग पन्नू याच्याकडे अमेरिका आणि कॅनडाचे दुहेरी नागरिकत्व आहे आणि तो खलिस्तानी दहशतवादाच्या आरोपाखाली भारतात वॉन्टेड आहे. पेशाने वकील असलेला पन्नू हा खलिस्तानी संघटना शीख फॉर जस्टिसचा प्रमुख आहे. खलिस्तान हे स्वतंत्र शीख राष्ट्र बनावे यासाठी पन्नूने जनमत चाचणी घेतली होती. ही चाचणी कॅनडा, ब्रिटन, अमेरिकेसारख्या मोठ्या प्रमाणावर भारतीय लोकसंख्या असलेल्या देशांत घेतली होती. २००७ मध्ये त्याने शीख फॉर जस्टिसची स्थापना केली होती.