नवी दिल्ली - पूर्व लडाखच्या सीमेजवळ लढाऊ विमानं उड्डाण केल्याबद्दल भारतानंचीनला इशारा दिला आहे. लडाखच्या सीमेपासून लढाऊ विमानं दूर ठेवा असं भारतानंचीनला बजावलं आहे. मागील काही दिवसांपासून चीनची लढाऊ विमानं भारताच्या सीमेजवळ आढळत आहेत. एकीकडे तैवानसोबत चीनचा संघर्ष वाढला असताना आता दुसरीकडे भारताने चीनला इशारा दिला आहे. अमेरिकन स्पीकर नैंसी पेलोसी यांच्या तैवान दोऱ्यामुळे चीन भडकला आहे. त्याविरोधात चीननं तैवान सीमजवळील परिसरात सैन्य अभ्यास सुरू केला आहे.
लडाख सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने चीनच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावली होती. त्यात भारताने पूर्व लडाखमधील ड्रॅगनच्या कारवायांवर विरोध दर्शवला. सरकारी सूत्रांनुसार, ही विशेष सैन्य बैठक मेजर जनरल यांच्या नेतृत्वात झाली. त्यावेळी एअर फोर्सचे एअर कोमोडोरही उपस्थित होते. भारत आणि चीन यांच्यात पूर्व लडाख येथे सुरू असलेल्या सीमासंघर्षावरून ही बैठक होती. जेव्हा भारतीय एअरफोर्सच्या अधिकाऱ्याने सैन्यस्तरीय बैठकीत सहभाग घेतला. या बैठकीत भारतानं स्पष्टपणे विमान उडवताना तुमच्या हद्दीत ठेवा असं बजावलं आहे. त्यासोबत ते एलएसी आणि १० किमी सीबीएम रेषेचे पालन करावं असंही भारतीय अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
एअर चीफ मार्शल वीआर चौधरी यांनी सांगितले की, भारत LAC च्या हवाई कारवायांवर नजर ठेवून आहे. एलएसीवर कुठलीही चीनची संशयास्पद हालचाल दिसली तर आम्हीही तातडीने लढाऊ विमानं सज्ज ठेवली आहेत. भारतीय सैन्यानं पूर्व लडाखच्या एलएसीवर रडार ठेवला आहे. जेणेकरून हवेत होणाऱ्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवली जाऊ शकते. भारत आणि चीन यांच्या पूर्व लडाखच्या सीमावादावरून अनेक बैठका झाल्या आहेत. परंतु एकीकडे शांततेसाठी बैठका सुरू ठेवायच्या दुसऱ्या विरोधी कारवाया करण्याचं धोरणं चीननं अवलंबलं आहे. त्यामुळे भारतही प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. भारत आणि चीन यांच्यात मागील २-३ वर्षापासून लडाख येथे संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष जास्त वाढू नये साठी दोन्ही बाजूच्या अधिकाऱ्यांकडून शांततेसाठी बैठका सुरू असतात.