नवी दिल्ली - पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना भेटण्याची त्यांच्या पत्नीला परवानगी दिली आहे. पण भारत या भेटीआधी बरीच सतर्कता आणि काळजी घेत आहे. पाकिस्तानचा इतिहास लक्षात ही खबरदारी घेणे आवश्यक आहे. पाकिस्तानने फक्त कुलभूषण जाधव यांच्या पत्नीला भेटण्याची परवानगी दिली आहे. पण सासूबाईंना म्हणजे कुलभूषण यांच्या आईलाही परवानगी द्यावी अशी त्यांच्या पत्नीची इच्छा आहे.
दरम्यान भारताने पाकिस्तानकडे कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आईच्या सुरक्षेची हमी मागितली आहे. पाकिस्तानात आल्यानंतर दोघींची कुठलीही चौकशी करु नये किंवा त्यांना त्रास देऊ नये अशी मागणी भारताने केली आहे तसेच तुरुंगात कुलभूषण यांना भेटण्याच्यावेळी पत्नीसोबत राजनैतिक अधिका-यालाही जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी भारताने केली आहे. मानवीय दृष्टीकोनातून कुलभूषण यांना भेटण्याची त्यांच्या पत्नीला परवानगी देत आहोत असे पाकिस्तानकडून सांगण्यात आले आहे.
भारतीय नागरिक कुलभूषण जाधव पाकिस्तानी तुरुंगात बंद आहेत. हेरगिरीच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. भारताने या निर्णयाला आंतरराष्ट्रीय कोर्टात आव्हान दिले आहे. सध्या हे प्रकरण आंतरराष्ट्रीय कोर्टात आहे. भारताने कुलभूषण जाधव यांच्या विषयावर आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव निर्माण केल्यामुळे पाकिस्तानला कुटुंबियांना भेटण्याची परवानगी देण्याचा निर्णय घ्यावा लागला.
भारतातील निवृत्त नौदल अधिकारी असलेल्या 46 वर्षीय जाधव यांना मार्च 2016 मध्ये बलुचिस्तानात अटक केल्याचा दावा पाकिस्तानी सुरक्षा दलांनी केला होता. पाकच्या लष्करी न्यायालयाने त्यांना हेरगिरी आणि घातपाती कारवायांच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा ठोठावली आहे. भारताने दाखल केलेल्या खटल्याप्रकरणी हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश गतवर्षी 13 डिसेंबर रोजी दिले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी होऊन आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीस स्थगिती देत पाकिस्तानला सणसणीत चपराक लगावली होती.