नवी दिल्ली - भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये पूर्व लडाखमध्ये (india china faceoff) गेल्या एक वर्षापासून सुरू असलेला तणाव आता निवळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. डिसएंगेजमेंटवर झालेल्या सहमतीनंतर दोन्ही देशांचे सैन्या पँगाँग त्सो परिसरातून हटवण्यात येत आहे. दरम्यान, दोन्ही देशांमधील तणाव निवळत असतानाच भारतीय लष्कराचे (Indian Army) नॉर्दन आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. (India avoided war with China, Says Northern Army Commander Y. K. Joshi)
डिसएंगेजमेंटच्या प्रक्रियेवर प्रतिक्रिया देताना लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी यांनी स्पष्टपणे सांगितले की, भारताने चीनसोबतचे युद्ध टाळले आहे. या तणावादरम्यान एकवेळ अशी आली होती जेव्हा दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचले होते. पूर्व लडाखमध्ये चीनसोबत निर्माण झालेल्या तणावादरम्यान अनेक चढ-उतार आले. पण ३१ ऑगस्ट रोजी दोन्ही देश युद्धाच्या परिस्थितीत पोहोचले होते. भारताने कैलाश पर्वतश्रेणीतील पर्वतांवर २९ आणि ३० ऑगस्टच्या रात्री कब्जा केला होता. त्यामुळे भारताला युद्धक्षेत्रात रणनीतिक आघाडी मिळाली होती. भारताने अचानक केलेल्या कारवाईमुळे भारताला धक्का बसला होता. त्यानंतर चिनी सैन्याने या पर्वतांवर नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र अखेरीस युद्धाची वेळ आली नाही.
दरम्यान, लडाखमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या Opration Snow leopard बाबत माहिती देताना वाय. के. जोशी यांनी सांगितले की, या कारवाईत भारतीय लष्कराने आपला कुठलाही भूभाग गमावला नाही. पँगाँग त्सोमधून चिनी सैन्याची माघार हा भारताचा विजय आहे.
पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवराच्या दक्षिण आणि उत्तर किनाऱ्यावर भारतीय लष्कराच्या धडाकेबाज कारवाईमुळे चिनी सैन्य हैराण झाले होते. भारताने अनेक ठिकाणी चीनपेक्षा अधिक रणनीतिक आघाडी घेतली होती. त्यामुळे भारत आपल्या मागण्यांपासून माघार घेणार नाही, त्यामुळे पूर्वस्थितीत जावे लागेल, याची जाणीव चीनला झाली.
या संपूर्ण तणावाच्या काळात भारतीय लष्कराने या परिसरातील काही महत्त्वपूर्ण शिखरांवर केलेला कब्जा हा टर्निंग पॉईंट ठरला. लेफ्टनंट जनरल जोशी यांनी सांगितले की, या आक्रमक कारवाईमुळे बळाचा वापर करून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील स्थिती एकतर्फी बदलता येणार नाही आणि भारत आपल्या भूभागाचे समर्थपणे रक्षण करेल हे चिनी सैन्याला कळून चुकले.