पटना - बांगलादेशात अजान सुरू झाली की त्याचा आवाज आमच्या घरापर्यंत येतो. आमच्या इथल्या लोकांची लग्नेही बांगलादेशात झाली आहेत. सुरुवातीला आम्ही लपून छपून ये-जा करत होतो परंतु मागील २० दिवसांपासून सर्व परिस्थिती बदलली आहे. सध्याच्या परिस्थितीत कुणी बांगलादेशात जाण्याचा विचारही करू शकत नाही असं सांगत डोळ्यात अश्रू आणि भीतीही दिसत होती. पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर येथे राहणाऱ्या कुकरौधा बॉर्डरजवळ राहणाऱ्या व्यक्तीची ही कहाणी आहे.
बांगलादेशातील हिंसक आंदोलनाचा फटका सीमेजवळ राहणाऱ्या या लोकांच्या आयुष्यावर पडला. कारण त्यांचे बागलादेशात रोटी-बेटी नाते होते. भारत आणि बांगलादेश यांच्यात ४०९६ किमी बॉर्डर आहे. त्यातील २२१७ किमी बॉर्डर पश्चिम बंगालला जोडलेली आहे आणि प.बंगालच्या उत्तरेकडील दिनाजपूर जिल्ह्यापासून बिहारचं किशनगंज अवघ्या २० किमी अंतरावर आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मार्गेत बांगलादेशी बिहारमध्ये ये-जा करत होते. बिहारमध्ये राहणारे बांगलादेशी याच मार्गाने जातात.
बांगलादेशात सुरु असलेल्या हिंसक आंदोलनात मागील २० दिवसांत ३२८ मृत्यू झालेत. भारत बांगलादेश सीमेजवळील एका गावात दैनिक भास्करनं साहिब या व्यक्तीची मुलाखत घेतली. त्यात तो म्हणाला की, माझं घर बॉर्डरपासून १ किमी अंतरावर आहे. नदीच्या या बाजूला आम्ही राहतो त्याबाजूला बांगलादेशी राहतात. आम्ही एकमेकांना भेटत नाही. शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी याठिकाणी जवान तैनात असतात. आम्ही नदीजवळ जाऊ शकतो, मासे पकडू शकतो पण त्याबाजूला जाऊ शकत नाही. कारण त्याबाजूला बांगलादेश आहे असं त्याने सांगितले.
तर इस्लामपूर बॉर्डरहून याआधी ये-जा सुरू होती. परंतु आता चिघळलेल्या परिस्थितीमुळे कडक बंदोबस्त आहे. १ महिन्यापूर्वी याठिकाणी एवढा बंदोबस्त नव्हता. ये-जा सुरू होती परंतु आता सर्व बंद आहे असं किशनगंजमध्ये राहणाऱ्या जमालनं सांगितले. किशनगंज आणि कटिहारसह बिहारमधील अनेकांची लग्न बांगलादेशात झाली आहेत. नेपाळसारखेच बांगलादेशात भारतीय लोकांची लग्न झालीत. त्यामुळे याठिकाणी बेटी-रोटीचं नाते बांगलादेशासोबत आहे.