गुवाहाटी : आसाममध्ये सत्तेवर आल्यास बांगलादेशातून होणारी स्थलांतरितांची घुसखोरी रोखण्यासाठी या देशासोबतची सीमा पूर्णपणे बंद करण्याचे आश्वासन भाजपने शुक्रवारी जारी केलेल्या ‘व्हिजन डाक्युमेंट’मध्ये दिले आहे. ‘आसाम व्हिजन डाक्युमेंट २०१६-२०२५- सबका साथ सबका विकास’ येथे जारी करताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्यावर शरसंधान साधले.अनेक दशकांपासून बेकायदेशीररीत्या स्थलांतरित लोक आसाममध्ये वास्तव्याला असून त्यामुळे या राज्यातील लोकसंख्येचा आलेख बिघडला आहे. गोगोई हे घुसखोरीला प्रोत्साहन देत आहेत, असा आरोप जेटली यांनी सदर जाहीरनामा जारी करताना केला.प्रथमच भाजपने आसाममधील बेकायदा स्थलांतरितांच्या प्रश्नाला जाहीरनाम्यात स्थान देत प्रमुख निवडणूक मुद्यांमध्ये समाविष्ट केले आहे. उद्योग, व्यवसाय, लघु आणि मध्यम उद्योग आणि अन्य संस्थांमध्ये घुसखोरांना रोजगार देत असल्यास कठोर कायद्याची अंमलबजावणी केली जाईल, असे जेटलींनी स्पष्ट केले. या राज्यात ४ आणि ११ एप्रिल अशा दोन टप्प्यांमध्ये निवडणूक होत आहे. (वृत्तसंस्था)अमित शहा यांच्या दोन जाहीर सभा...भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसागर आणि सोनारी येथे दोन जाहीर सभांना संबोधित करताना भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्याचे आश्वासन दिले. गरिबांना मदत करणारे सरकार गोगोई देऊ शकत नाहीत. केवळ भाजपच हे करू शकते. या राज्यातील जनतेने गोगोर्इंना १५ वर्षे सत्ता दिली मात्र हे राज्य जागच्या जागीच आहे. काँग्रेसच्या ५५ वर्षांच्या राजवटीत हे राज्य कधीही सुरक्षित राहिले नाही, असेही शहा यांनी म्हटले.
भारत-बांगलादेश सीमा बंद करणार
By admin | Published: March 26, 2016 1:06 AM