ढाला : खग्राबारी (बांगलादेश) - भारत व बांगलादेश यांच्यातील परस्परांना जमिनी परत करण्याचा ऐतिहासिक करार शुक्रवारी मध्यरात्री प्रत्यक्षात येणार असून, यामुळे गेली ७० वर्षांचा सीमावाद संपणार आहे. याप्रसंगी१६२ गावांचे विभाजन होणार असून, भारतातील ५१ गावे तर बांगलादेशातील १११ गावे यांचे पुनर्वाटप होणार आहे. जूनमध्ये झालेल्या ऐतिहासिक करारानुसार हे विभाजन होत आहे. मध्यरात्री १२ वाजल्यानंतर एक मिनिटाने हे विभाजन होईल. दोन्ही देशांचे अधिकारी आपापल्या सीमेवर ध्वजारोहण करतील. त्यानंतर दोन्ही देशातील गावांभोवती असणारी दुसऱ्या देशाची गावे परस्परांना दिली जातील व तिथे राहणाऱ्या ५० हजार नागरिकांना नागरिकत्वाचे फायदे मिळू शकतील. या अंतर्गत शाळा, ऊर्जा पुरवठा व आरोग्य सेवा या सुविधा या नागरिकांना उपलब्ध होतील. १९४७ पासून हे नागरिक कोणत्याही सुविधेशिवाय गुजारा करत होते. परस्परांना गावे देण्याच्या अंतिम प्रहरात नागरिक एकमेकांना मेजवान्या देत असून, ज्या देशात जाणार त्या देशाचे राष्ट्रगीत पाठ करत आहेत. भारतात माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या निधनामुळे दुखवटा चालू आहे, त्यामुळे या मेजवान्यांचे स्वरूप थोडेसे साधेसुधे आहे. मध्यरात्रीचा प्रहर होताच या भूभागात ६८ मेणबत्या पेटविल्या जातील. ब्रिटिश राज्य संपल्यानंतरची ६८ वर्षे या लोकांनी बिनसरकारी अवस्थेत घालविली आहेत, त्याचे हे प्रतीक आहे. अनुभव हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा समारंभ आहे. मला काय वाटते आहे हे मी सांगू शकत नाही असे पारुल खातुन (३५) या भारतीय खेडे कोट बाजनीत येणाऱ्या महिलेने सांगितले. मला आता बांगलादेशी नागरिकाप्रमाणे सुविधा मिळतील असे तिने सांगितले. तिच्याकडे राष्ट्रीयत्वाची ओळख देणारे कार्ड नसल्यामुळे प्रसूती जवळ आलेली असताना तिला बांगलादेशातील रुग्णालयातून हाकलून लावले होते. ही आठवणही तिने जागविली. या गावांची मालकी स्थानिक राजकुमाराने अनेक वर्षांपूर्वी ठरवली होती. १९४७ साली ब्रिटिश राजवट संपल्यानंतर झालेल्या भारत-पाक फाळणीत या गावांचेही विभाजन झाले. १९७१ साली बांगलादेशमुक्ती युद्धातही या गावांना न्याय मिळाला नाही. बांगलादेशाने १९७४ साली या गावांच्या सीमा बदलण्याचा प्रस्ताव मांडला होता; पण भारताने त्या करारावर जून २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी केली. दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी सर्व्हे केले. नागरिकांना कोणत्या देशात राहायचे आहे, हा प्रश्न विचारला. बांगलादेशी भागातील नागरिकांनी बांगलादेशातच जाण्याची इच्छा व्यक्त केली. बांगलादेश सीमेअंतर्गत गावातील १ हजार लोकांनी भारतात येण्याची इच्छा व्यक्त केली. भारतातील बांगलादेशी गावात राहणाऱ्यांनी आपले राष्ट्रीयत्व बदलले आहे. (वृत्तसंस्था)
भारत, बांगलादेशचा नकाशा बदलला
By admin | Published: August 01, 2015 2:07 AM