नवी दिल्ली: मोदी सरकारनं रेफ्रिजरेंट असलेल्या एअर कंडिशनरच्या आयातीवर बंदी घातली आहे. देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आत्मनिर्भर भारत उपक्रमाच्या अंतर्गत अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंची आयात कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून एसींची आयात रोखण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे. रेफ्रिजरेंट असलेल्या एअर कंडिशनरची आयात रोखण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती व्यापार संचलनालयानं एका नोटिफिकेशनच्या माध्यमातून दिली. रेफ्रिजरेंट असलेल्या एअर कंडिशनरच्या आयातीचं धोरण 'मुक्त'वरून 'प्रतिबंधित' करण्यात आल्याची माहिती संचलनालयानं दिली आहे. व्यापार आणि उद्योग मंत्रालयानं अत्यावश्यक नसलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या आयात धोरणाचा आढावा घेतला. त्यानंतर एसीची आयात रोखण्याचा निर्णय घेण्यात आला.विविध क्षेत्रांमध्ये पूर्णपणे स्वावलंबी होण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. आत्मनिर्भर भारत अभियानावर भाष्य करताना जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एसीच्या आयातीचा विशेष उल्लेख केला. 'एसी उत्पादनात स्वावलंबी होण्याची गरज आहे. आपण आपल्या एकूण मागणीच्या ३० टक्क्यांहून एसी आयात करतो. आपल्याला हे प्रमाण वेगानं कमी करायला हवं,' असं मोदी म्हणाले होते.अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंची आयात कमी करण्याचे प्रयत्न सरकारकडून सातत्यानं सुरू आहेत. जूनमध्ये सरकारनं कार, बस, ट्रक आणि दुचाकींमध्ये वापरले जाणारे न्यूमॅटिक टायरची आयात रोखण्याचा निर्णय घेतला. याआधी सरकारनं टीव्हीपासून संरक्षण सामग्रीपर्यंतची आयात थांबवण्याचे निर्णय घेतले आहेत.चीनला मोठा धक्काभारत एसींची सर्वाधिक आयात चीन आणि थायलंडमधून करतो. भारताच्या एकूण आयातीच्या ९० टक्के आयात या दोन देशांमधून होते. त्यामुळे एसीच्या आयातीवर घातलेली बंदी चीनसाठी धक्का मानला जात आहे.