ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि, 19 - नुकत्याच गोवा येथे झालेल्या ब्रिक्स परिषदेच्या मंचाचा वापर भारताने पाकिस्तानला एकाकी पाडण्यासाठी केल्याचा आरोप चीनमधील सरकारी प्रसारमाध्यमांनी केला आहे. तसेच या अधिवेशनामधून भारताने एक जबाबदार देश अशी स्वत:ची प्रतिमा निर्माण करून एनएसजी सदस्यत्व आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व मिळवण्यासाठी दावेदारी भक्कम केल्याचेही चिनमधील प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.
उरी हल्ला आणि सर्जिकल स्ट्राइकमुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर भारताने भू-रणनीतिक स्वार्थ साधण्यासाठी ब्रिम्सटेकला ब्रिक्सशी जोडले. तसेच या संमेलनास पाकिस्तान वगळता उपखंडातील सर्व देशांना निमंत्रित करून उपखंडामध्ये पाकिस्तानला एकाकी पाडले आहे, असे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे. उरी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पाडण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती. दरम्यान, चिनी मीडियाने भारताचे प्रयत्न यशस्वी ठरल्याचे मान्य करणे महत्त्वपूर्ण आहे.
भारतासाठी पाकिस्तानचा समावेश असलेल्या सार्कपेक्षा ब्रिम्सटेक अधिक फायदेशीर आहे. कारण पाकिस्तान सदस्य नसलेल्या ब्रिम्सटेकमध्ये वर्चस्व गाजवणे भारतासाठी अधिक सोपे आहे, असेही ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे.
ब्रिक्स संमेलनामध्येही पंतप्रधान नरेंद् मोदी यांनी केलेल्या भाषणात पाकिस्तानचा दहशतवादाची जन्मभूमी असा उल्लेख केला होता. तसेच परिषदेच्या घोषणापत्रात ब्रिक्स राष्ट्रांनी दहशतवादाविरोधात एकजूट दाखवली होती. पण पण चीनच्या विरोधामुळे पाकिस्तानचा दहशतवादी राष्ट्र असा उल्लेख करण्यात आला नव्हता.