बलिया- 2024 पर्यंत भारत हिंदू राष्ट्र होणार असल्याचा दावा उत्तर प्रदेशातील भाजपाच्या एका आमदाराने केला आहे. तसंच भारतीय संस्कृती मानणारे मुसलमानच या देशात राहणार असल्याचं वादग्रस्त वक्तव्यही त्यांनी केलं आहे. उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यातील बैरियाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी शनिवारी हे वक्तव्य केलं आहे.
शनिवारी रात्री पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, देशात काही मुस्लिम हे देशभक्त आहेत पण जेव्हा भारत हिंदू राष्ट्र होईल तेव्हा मुस्लिमांना आमच्या संस्कृतीत मिळून मिसळून राहावे लागेल तरच ते देशात राहू शकतील, ज्यांना हे पटत नसेल त्यांनी देशाबाहेर जावे. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे अवतार पुरूष आहेत. २०२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण होत असून २०२४ मध्ये भारत हिंदू राष्ट्र होईल. मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्याचवेळी भारत हा महाशक्ती झालेला असेल त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही वाटा असणार आहे.
पण या विधानावर भाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांनी घुमजाव केलं आहे. माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेला, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. देशात जे 50 टक्के मुसलमान बंधू आहेत ते हिंदू आहेत, त्यांचं इस्लाम धर्मात परिवर्तन केलं गेलं आहे. ते स्वतःला पुन्हा मुख्यधारेत जोडले जातील. पण जे मुस्लिम भारतात राहून पाकिस्तानचा विचार करतात त्यांना देश सोडून जायला हवं, अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांनी इंडियन एक्स्प्रेसची बोलताना दिली आहे. ही माझी व्यक्तिगत विचारसरणी असून याच्याशी पक्षाचा काहीही संबंध नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.