संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सध्या लडाख दौऱ्यावर आहेत. येथे त्यांनी भारतीय सैन्याचे अधिकारी आणि जवानांशी एका कार्यक्रमादरम्यान संवाद साधला. यावेळी त्यांनी भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांनाही कठोर शब्दात संदेश दिला. "भारत हा कोणत्याही वादांवर चर्चेच्या मार्गातून तोडगा काढण्यावर विश्वास ठेवतो. परंतु जर भारताला उकसवलं किंवा धमकावण्याचा प्रयत्न केला तर ते कधीही सहन केलं जाणार नाही," असं राजनाथ सिंग म्हणाले.
"भारत एक शांतताप्रिय देश आहे. भारत कधीही कोणावर आक्रमण करतच नाही. परंतु भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना योग्य ते उत्तर देण्यास भारत कायमच तयार आहे," असंही राजनाथ सिंह म्हणाले. "जर तुमची इच्छाशक्ती चांगली असेल तर कोणत्याही वादावर तोडगा काढला जाऊ शकतो," असंही त्यांनी नमूद केलं. यावेळी त्यांनी गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजलीही वाहिली.