नवी दिल्ली: कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर काश्मीरमधील विविध समुदायांची भेट देणाऱ्या सुफी शिष्टमंडळानं पाकिस्तानचे वाभाडे काढले आहेत. कलम ३७० रद्द केल्यामुळे जळफळाट झालेल्या पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी जिहादचा नारा दिला होता. यावर भाष्य करताना सुफी शिष्टमंडळातील मुस्लिम विद्वानांनी खान यांच्यावर तोफ डागली आहे. पाकिस्तानच्या चुकीच्या प्रचारामुळेच दोन देशांमध्ये युद्धसदृश्य स्थिती निर्माण होत असल्याचं शिष्टमंडळानं म्हटलं आहे. मुस्लिम विद्वानांनी काश्मीर भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. 'भारत मुस्लिमांसाठी सर्वोत्तम देश आहे. पाकिस्तानी पंतप्रधानांनी घेतलेली जिहादी भूमिका अतिशय लज्जास्पद आहे. पाकिस्तानला युद्धाची इतकीच खुमखुमी असेल, तर त्यांनी पॅलेस्टाईन किंवा चीनमध्ये जावं. आम्हाला त्यांची सल्ल्याची गरज नाही,' अशा शब्दांमध्ये नसीरुद्दीन चिश्तींनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. जिहादच्या नावाखाली सीमेपलीकडून पसरवल्या जाणाऱ्या दहशतवादाला बळी पडू नका, असं आवाहन चिश्तींनी काश्मिरींना केलं. 'काश्मिरातील परिस्थितीचा कोणत्याही धर्माशी संबंध नाही. मात्र पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या खोट्या प्रचारामुळे दोन देशांमधील परिस्थिती चिघळली आहे. यातील एका बाजूला विकास आणि भरभराट आहे आणि दुसऱ्या बाजूला अमानवता आहे,' असं चिश्ती म्हणाले.
भारत मुस्लिमांसाठी सर्वोत्तम देश; सुफी स्कॉलरनं काढले पाकिस्तानी नेत्यांचे वाभाडे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 4:28 PM