नवी दिल्ली : कोरोना विषाणूमुळे पसरलेल्या ‘कोविड-१९’ या संसर्गजन्य आजाराचा फैलाव सुरू झाल्यानंतर भारताने इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, इटली, स्पेन, दक्षिण कोरिया या देशांपेक्षा तातडीने हालचाली करून प्रतिबंधक उपाययोजना केल्या, अशा शब्दांत आॅक्सफर्ड विद्यापीठाने आपल्या देशाचे कौतुक केले आहे. विद्यापीठाने यासंदर्भात केलेल्या एका अभ्यासातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
ही साथ पसरल्यानंतर ती रोखण्यासाठी प्रत्येक देशाने किती तत्परतेने हालचाली केल्या, याचा अभ्यास ‘आॅक्सफर्ड कोव्हिड-१९ गव्हर्न्मेंट रिस्पॉन्स ट्रॅकर’ (ओएक्ससीजीआरटी) यांच्या माध्यमातून करण्यात आला. या अभ्यासासाठी ११ निकष निश्चित करून विद्यापीठाने माहिती गोळा केली. कोरोनाची साथ आल्यानंतर कोणत्या देशाने तातडीने निर्णय घेतले, याचा अभ्यास विद्यापीठाने केला. त्या बाबींमध्ये शाळा व सर्व शिक्षणसंस्था बंद करणे, सार्वजनिक कार्यक्रम रद्द करणे, सार्वजनिक वाहतूक स्थगित करणे, लोकजागृतीसाठी मोहीम हातीघेणे, अर्थव्यवस्था सावरण्यासाठी उपाययोजना करणे, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय वाहतूक सेवा स्थगित करणे, आरोग्यसेवेसाठी अधिक निधी उपलब्ध करणे, लस निर्मितीसाठी केलेले जोरदार प्रयत्न, लसीच्या चाचणीसाठी केलेल्या सोयी, रुग्णांच्या संख्येवर लक्ष ठेवणे आदी गोष्टींचा समावेश आहे.‘ओएक्ससीजीआरटी’ प्रकल्पात सहभागी व ब्लावंटिक स्कूल आॅफ गव्हर्मेंट येथील सहाय्यक प्राध्यापक थॉमस हेल म्हणाले, ‘कोरोना साथ पसरल्यानंतर विविध देशांच्या सरकारांनी किती जलद वा विलंबाने निर्णय घेतले याबद्दल आम्ही केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष धोरणकर्त्यांना मार्गदर्शक ठरतील. अशा साथीच्या वेळेस तातडीने व परिणामकारक ठरतील, अशी कोणती पावले उचलायला हवी, हेही या अभ्यासाच्या निष्कर्षांतून लक्षात येते.’तातडीच्या निर्णयांमुळे उजवी कामगिरीकोरोना साथीचा धोका लक्षात घेऊन भारतात केंद्र सरकारने पहिल्यापासून अतिशय तातडीने निर्णय घेतले. आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवा स्थगित केली, २१ दिवसांचा लॉकडाऊन पुकारला, राज्याच्या सीमा बंद केल्या. तसेच, १२ लाख लोकांची आतापर्यंत कोरोना विषाणूची लागण झाली की नाही, हे तपासण्यासाठीचाचणी करण्यात आली आहे. अन्य कोरोनाग्रस्त देशांच्या तुलनेत भारताची ही कामगिरी उजवी असल्याचे निष्कर्षात म्हटले आहे.