Corona Update India: कोरोना संबंधी एक अतिशय महत्त्वाची, आनंददायी आणि दिलासादायक गोष्ट आज भारतात घडली आहे. इतर देशांमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढत असतील, तरी भारतात मात्र या महामारीचा वेग मंदावला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मंगळवारी गेल्या २४ तासांत देशात ६२५ COVID-19 रुग्ण आढळले. पण सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे, ९ एप्रिल २०२० नंतर इतकी कमी प्रकरणे नोंदवली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच २०२० नंतर असे भारतात पहिल्यांदाच २४ तासांच्या कालावधीत कोरोनामुळे एकाही मृत्यूची झाली नाही. ताज्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या जरी ४ कोटी ४६ लाख ६२ हजार १४१ वर गेली असली, तर सक्रिय रूग्णसंख्या ही १४ हजार ०२१ इतकी कमी झाली आहे. तर आज एकही कोरोनाबाधिक मृत्यू न झाल्याने मृतांची संख्या ५ लाख ३० हजार ५०९ इतकी कायम आहे.
९ एप्रिल २०२० रोजी एकाच दिवसात एकूण ५४० नवीन प्रकरणे नोंदवली गेली. मार्च २०२० नंतर असे पहिल्यांदाच घडले की गेल्या २४ तासात देशात एकाचाही मृत्यू झालेला नाही. कर्नाटकातील कलबुर्गी येथे ७६ वर्षीय व्यक्ती भारतात कोरोना विषाणूचा पहिला बळी ठरला होता. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, सध्या एकूण प्रकरणांपैकी ०.०३ टक्के सक्रिय प्रकरणे आहेत, तर राष्ट्रीय कोविड-19 रिकव्हरी रेट ९८.७८ टक्क्यांवर पोहोचला आहे. या आजारातून बरे होणाऱ्या लोकांची संख्या ४ कोटी ४१ लाख १७ हजार ६११ झाली आहे, तर मृत्यूदर १.१९ टक्के नोंदवला गेला. मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशात कोविड-19 लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात कोविड लसीचे २१९.७४ कोटी डोस देण्यात आले आहेत.
भारतातील कोविड-19 ची संख्या ७ ऑगस्ट २०२० रोजी २० लाख, २३ ऑगस्ट रोजी ३० लाख, ५ सप्टेंबर ४० लाख आणि १६ सप्टेंबर रोजी ५० लाखांवर गेली होती. २८ सप्टेंबर रोजी ६० लाख, ११ ऑक्टोबर रोजी ७० लाखांचा आकडा पार केला होता. २९ ऑक्टोबरला ८० लाख, २० नोव्हेंबरला ९० लाख आणि १९ डिसेंबरला एक कोटींचा टप्पा पार केला. भारतात ४ मे रोजी २ कोटी, गेल्या वर्षी २३ जून रोजी ३ कोटी आणि यावर्षी २५ जानेवारी रोजी ४ कोटी प्रकरणे पार केली.