नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून आमच्या अंतर्गत बाबींमध्ये इतर देशांनी नाक खुपसायची काहीही गरज नाही, असा इशारा भारताने दिला आहे. काश्मीरमधील स्थितीवर आमचे बारीक लक्ष असून पाकिस्तानसाठी महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींना चीनचा पाठिंबा राहील, असे क्षी जिनपिंग यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी बुधवारी झालेल्या बैठकीत म्हटले होते. त्या उद्गारांवर भारताने तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.क्षी जिनपिंग ११ आॅक्टोबरपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत असून तामिळनाडूमधील मामल्लपुरम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्याशी चर्चा करणार आहेत. असे असतानाही काश्मीरच्या विषयावरून भारताने चीनला फटकारले आहे.यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी सांगितले की, इम्रान खान व क्षी जिनपिंग यांच्या बैठकीत काश्मीर प्रश्नावर चर्चा झाल्याच्या बातम्या वाचनात आल्या. जम्मू-काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग असून आमची ही भूमिका चीनला नीट माहिती आहे. काश्मीरच्या प्रश्नात इतर देशांनी हस्तक्षेप करण्याचे काहीही कारण नाही.इम्रान खान यांना सल्लाजम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम भारताने ५ आॅगस्ट रोजी रद्द केले. त्यामुळे संतापलेल्या पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताविरोधात केलेल्या अपप्रचाराला प्रमुख देशांनी अजिबात महत्त्व दिले नाही. संयुक्त राष्ट्रांमध्येही पाकिस्तानने काश्मीरबाबत मांडलेल्या मुद्द्यांची फारशी कोणी दखल घेतली नाही.पाकिस्तान व चीनमध्ये उत्तम संबंध असल्याने काश्मीरबाबत चीन आपल्याला पाठिंबा देईल अशी अटकळ बांधून इम्रान खान यांनी क्षी जिनपिंग यांच्याकडे बुधवारी तो विषय काढला. त्यावेळी पाकिस्तानला जिनपिंग यांनी चुचकारलेच, मात्र काश्मीर प्रश्न भारत व पाकिस्तानने चर्चेच्या माध्यमातूनच सोडवावा असा सल्ला इम्रान खान यांना द्यायलाही ते विसरले नाहीत.
काश्मीर प्रश्नात इतर देशांनी नाक खुपसू नये, भारताने चीनला फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 1:38 AM