नवी दिल्ली/ढाका : भारत बांगलादेशमध्ये १.६ अब्ज डॉलरचा वीज प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पासाठी अनेक वर्षे वाटाघाटी सुरू होत्या. त्यांना अंतिम रूप मिळाले असून सार्वजनिक क्षेत्रातील भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) १,३२० मेगावॅट क्षमतेचा वीज प्रकल्प दक्षिण बांगलादेशातील खुलना येथे उभारणार आहे. या करारावर येत्या २८ फेब्रुवारी रोजी उभय देश स्वाक्षऱ्या करतील, असे नवी दिल्ली आणि ढाक्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.या प्रकल्पासाठी भारताची चीनसोबत अत्यंत कडवी अशी व्यावसायिक स्पर्धा होती. त्यात या नियोजित कराराने चीनला हरविले. चीनने नुकतेच श्रीलंकेत विकासाचे प्रकल्प सुरू करण्यात यश मिळविले असताना बांगलादेशात भारताला प्रवेश मिळाला आहे. बांगलादेश हे आपले जणू अंगणच आहे, असा समज करून वागणाऱ्या चीनचे या प्रांतात अतिक्रमण वाढतच चालले आहे.चीनच्या हर्बीन इलेक्ट्रिक इंटरनॅशनल कंपनीला बांगलादेशातील हा प्रकल्प तांत्रिक मुद्द्यांवर गमवावा लागला, असे बांगलादेशच्या अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
भारत बांगलादेशात उभारणार १.६ अब्ज डॉलरचा वीज प्रकल्प
By admin | Published: February 24, 2016 11:41 PM