ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - जापान बरोबर रणनितीक भागीदारी वाढवण्यासाठी भारत जापानकडून यूएस - २ आय विमान खरेदीचा करार करु शकतो. या विमान खरेदीची रखडलेली चर्चा पुन्हा सुरु करणार असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ११-१२ नोव्हेंबरला जापान दौ-यावर जाणार आहेत.
त्यावेळी दोन्ही देशांमध्ये या विमान खरेदीच्या करारावर स्वाक्षरी होऊ शकते. सोमवारी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या बैठकीत या खरेदीसंबंधी निर्णय घेण्यात येईल. तटरक्षक दल आणि नौदलासाठी प्रत्येकी सहा अशी मिळून १२ यूएस - २ आय विमाने खरेदी करण्याचा विचार आहे.
जमीन आणि पाणी अशा दोन्ही ठिकाणांवरुन लँडीग आणि उड्डाण हे यूएस-२ आयचे वैशिष्ट आहे. शोध मोहिम आणि बचाव मोहिमेमध्ये हे विमान सर्वाधिक उपयोगी ठरणार आहे. आणीबाणीच्या प्रसंगात सज्ज असलेल्या सैनिकांनाही तात्काळ पोहोचवता येऊ शकते. या बारा विमानांची एकूण किंमत १० हजार कोटी रुपये आहे. अमेरिकेप्रमाणेच जापान बरोबर भारताची वाढती जवळीक चीनला खटकणारी आहे. कारण सीमेवरुन जापानबरोबरही चीनचे वाद सुरु असतात.