रशियाशी गॅस पाइपलाइनचा व्यवहार करू शकतो भारत; चीनशी बरोबरी करण्याची तयारी!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 07:48 AM2022-02-28T07:48:23+5:302022-02-28T07:53:03+5:30
युक्रेन संकटानंतर भारताला आपला आर्थिक आणि सामरिक फायदा करून घ्यावा लागेल.
शरद गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याने रशियावर आर्थिक दबाव आला आहे. या घटनाक्रमाचे संधीत रूपांतर करत, भारत हा रशियासोबत गॅस पाइपलाइनचा व्यवहार करू शकतो. यामुळे भारत हा चीनची बरोबरी करू शकतो. चीनने अलीकडेच रशियासोबत ५०० मिलियन डॉलरच्या गॅस पाइपलाइनचा करार केला आहे.
भारताचे माजी परराष्ट्र सचिव शशांक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, युक्रेन संकटानंतर भारताला आपला आर्थिक आणि सामरिक फायदा करून घ्यावा लागेल. चीन आणि रशियाचे वाढते आर्थिक संबंध पाहता, अमेरिका आणि युरोपला नाराज न करता, स्वस्त गॅस आणण्याचा प्रयत्न करावा लागेल.
अमेरिकेच्या विस्तारवादी धोरणाचा परिणाम
- शशांक यांनी सांगितले की, रशियाला स्विफ्ट इंटरनॅशनल पेमेंट सीस्टिममधून बाहेर काढण्यात आले आहे.
- युरोपीय देशांनी त्यांच्यावर आर्थिक निर्बंध लावण्याची घोषणा केली आहे. रशिया केवळ अस्तित्व वाचविण्याचे प्रयत्न करीत नाही, तर आपले सुपर पॉवरचे स्थान दाखविण्याच्या प्रयत्नात आहे.
- या काळात आम्ही तुर्कमेनिस्तान, अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत गॅस पाइपलाइनला पुनर्जीवित करू शकतो.
- ही लढाई अमेरिकेच्या विस्तारवादी धोरणाचा परिणाम आहे, असेही ते म्हणाले.