Donald Trump Tariffs : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत येताच भारतासह अनेक देशांवर परस्पर शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे. येत्या 2 एप्रिल 2025 पासून हे परस्पर शुल्क लागू केले जाणार आहे. दरम्यान, घोषणेमुळे भारत आणि कॅनडामधील बिघडलेले संबंध पुर्ववत होत आहेत. याचे कारण म्हणजे, अमेरिकेच्या घोषणेमुळे भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांना आर्थिक धक्का बसू शकतो. यामुळेच दोन्ही देशांनी व्यापार सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
खलिस्तानी मुद्द्यांवर झालेला वाद...2023 मध्ये माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर खलिस्तानी नेता हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येचा आरोप केल्यावर भारत-कॅनडाच्या संबंधात तणाव निर्माण झाला होता. यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. आता नवे पंतप्रधान मार्क कार्नी सत्तेवर आल्यानंतर कॅनडा भारतासोबतचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहे.
यूएस टॅरिफशी एकत्रितपणे सामना करणारडोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन शुल्क धोरणामुळे भारत आणि कॅनडा, या दोन्ही देशांचे आर्थिक नुकसान होऊ शकते. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, भारत आणि कॅनडा आपले मतभेद बाजूला ठेवून अमेरिकन टॅरिफचा प्रभाव कमी करण्यासाठी धोरण आखत आहेत. कॅनडाच्या अधिकाऱ्यांच्या मते भारतासोबत चांगले व्यापारी संबंध हे कॅनडाचे प्राधान्य आहे.
या आरोपामुळे तणाव वाढणार? मात्र, भारत आणि कॅनडामधील संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांदरम्यान कॅनडाने नवे वादग्रस्त विधान केले आहे. भारत कॅनडाच्या निवडणुकीत हस्तक्षेप करू शकतो, असा दावा कॅनडाच्या एका गुप्तचर अधिकाऱ्याने केला. या विधानामुळे दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा वाढू शकतो. ट्रम्प यांच्या धोरणांमुळे भारत आणि कॅनडामधील व्यापारी संबंध मजबूत होऊ शकतात, पण खलिस्तानी मुद्द्यामुळे आणि राजकीय आरोपांमुळे ही मैत्री किती काळ टिकेल हे पाहणे महत्वाचे आहे.