India-Canada Row: भारत आणि कॅनडामधील संबंध गेल्या काही दिवसांपासून बिघडलेले आहेत. खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जरच्या हत्येवरून दोन्ही देशांमध्ये वाद सुरू आहे. दरम्यान, भारताने कॅनेडियन नागरिकांसाठी बंद केलेली व्हिसा सेवा बुधवारी (25 ऑक्टोबर) पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
कॅनडाच्या ओटावामधील भारतीय उच्चायुक्तांनी (High Commission of India) सोशल मीडियावर सांगितले की, व्हिसा सेवा केवळ प्रवेश व्हिसा, व्यवसाय व्हिसा, वैद्यकीय व्हिसा आणि कॉन्फरन्स व्हिसा या श्रेणींमध्ये सुरू करण्यात आल्या आहेत. उच्चायुक्तांनी निवेदनात पुढे म्हटले की, सुरक्षा कारणास्तव यापूर्वी व्हिसा देण्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. आता सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर पुन्हा व्हिसा सेवा सुरू करण्यात आली आहे. गुरुवारपासून (26 ऑक्टोबर) या निर्णयाची अंमलबजावणी होईल.
कॅनडाने 41 अधिकाऱ्यांना परत बोलावलेपरराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी अलीकडेच सांगितले होते की, भारतात कॅनडाच्या डिप्लोमॅट्सची संख्या जास्त आहे, त्यामुळे समतोल निर्माण करण्याची गरज आहे. हे लोक भारताच्या अंतर्गत बाबींमध्येही ढवळाढवळ करतात. त्यामुळे कॅनडाने आपले अधिकारी परत बोलवावे, आम्ही लवकरच त्यांना दिलेली सूट मागे घेणार आहोत. यानंतर कॅनडाला आपले 41 अधिकारी परत बोलावावे लागले.
वाद कसा सुरू झाला?कॅनडात राहणाऱ्या खलिस्तानी समर्थक हरदीपसिंग निज्जरची जुन महिन्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी या हत्येचा आरोप भारतावर लावला. भारतीय गुप्तचर संस्थांनी हत्या केल्याचे वक्तव्य ट्रुडो यांनी त्यांच्या संसदेत केले. याला उत्तर देताना भारताने ट्रूडोचे सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले होते. या वक्तव्यानंतरच हा वाद सुरू झाला.