India-Canada Relations: खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडामधील संबंध बिघडले आहेत. अलीकडेच भारत सरकारने कॅनडाच्या 41 अधिकाऱ्यांना (डिप्लोमॅट) भारत सोडण्याचा आदेश दिला, यामुळे कॅनडाने भारतावर टीका केली. आता यी टीकेला भारत सरकारने शुक्रवारी (20 ऑक्टोबर) उत्तर दिले.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी एक निवेदन जारी करून म्हटले की, कॅनडाच्या सरकारने 19 ऑक्टोबर (गुरुवार) रोजी अधिकाऱ्यांबाबत दिलेले विधान आम्ही पाहिले. भारतात कॅनडाचे अधिकारी जास्त आहेत, ते सतत आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करतात.
निवेदनात पुढे म्हटले की, नवी दिल्ली आणि ओटावा येथील अधिकाऱ्यांची संख्या समान करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही गेल्या महिन्यापासून कॅनडाशी याबद्दल बोलत आहोत. ही संख्या समान करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. आम्ही आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केले नाही, त्यामुळे त्यांच्या आरोपांचे खंडन करतो. भारताच्या निर्णयानंतर कॅनडाने आपल्या अनेक अधिकाऱ्यांना परत बोलावून घेतले आहे.