तिरुअनंतपुरम: भारतात डाव्या विचारसरणीने खंबीर राहण्याची गरज आहे. त्यांचे अस्तित्त्व संपले तर ते देशासाठी खूप मोठे संकट असेल, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी मांडले. ते रविवारी तिरूअनंतपुरम येथील कार्यक्रमात बोलत होते. नुकत्याच झालेल्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भाजपाने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची 25 वर्षांची सत्ता उलथवून ऐतिहासिक यश संपादन केले होते. देशभरातील डाव्या चळवळीसाठी हा खूप मोठा धक्का होता. त्रिपुरातील पराभवामुळे आता भारतात फक्त केरळमध्ये डाव्यांची सत्ता उरली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना जयराम रमेश यांनी म्हटले की, डाव्यांची सद्दी संपणे हा भारतासमोरील सर्वात मोठा धोका आहे. त्यामुळे डाव्या चळवळीने खंबीर राहिले पाहिजे. आम्ही (काँग्रेस) भले एकमेकांचे राजकीय विरोधक असू. मात्र, डाव्यांचा अस्त होणे हे भारताला परवडू शकत नाही. देशासाठी ते खूप मोठे संकट असेल, असे जयराम रमेश यांनी म्हटले. मात्र, याचवेळी जयराम रमेश यांनी डाव्या पक्षांनी बदलण्याची गरजही व्यक्त केली. डाव्यांना त्यांची मानसिकता बदलावीच लागेल. लोकांच्या बदलत्या आकांक्षा आणि समाजातील बदलती परिस्थिती त्यांनी ध्यानात घेतली पाहिजे, असे जयराम रमेश यांनी सांगितले.
डावे संपले तर देश धोक्यात येईल; जयराम रमेश यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2018 9:35 AM