नवी दिल्ली, दि. 15 - चीनसोबत डोकलामवरुन सुरु असलेल्या वादावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत सर्व प्रकारच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचं सांगितलं आहे. मग ते आव्हान समुद्री भागातून असो अथवा सीमेवरुन, भारत सर्व आव्हानांशी दोन हात करण्यासाठी तयार असल्याचं पंतप्रधान मोदी बोलले आहेत. मोदींनी यावेळी चीनचा उल्लेख न करता हा इशारा दिला आहे. देशाची सुरक्षा आपल्या सरकारची प्राथमिकता असून, सीमारेषा सुरक्षित ठेवण्यासाठी जवनांना तैनात करण्यात आल्याचंही ते बोलले आहेत.
आणखी वाचादिव्यांगांसह, सर्वांना एकत्र आणणारे लोकमत व त्रिनयनी प्रस्तुत राष्ट्रगीतलाल किल्ल्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला 'न्यू इंडिया'चा नारा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करुन सलग चौथ्यांदा देशवासियांनी संबोधित केले. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी गतवर्षी सीमारेषा ओलांडून करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख जगाने भारतीय लष्कराची क्षमता पाहिली असल्याचं सांगितलं. मोदींनी सांगितलं की, 'देशाची सुरक्षा आमची प्राथमिकता आहे. सर्व भागांमध्ये देशाची सुरक्षा करण्यात आम्ही सक्षम आहोत'.
पुढे बोलताना मोदींनी सांगितलं की, 'जेव्हा सर्जिकल स्ट्राईक झाला तेव्हा जगाला आपलं सामर्थ्य दिसलं होतं. आपली काय ताकद आहे हे सर्वांनी मान्य केलं. देशाची सुरक्षा आमची प्राथमिकता आहे हे स्पष्ट आहे. समुद्र असो अथवा सीमा, सायबर असो किंवा अंतर्गत, सर्व प्रकारची सुरक्षा करण्यामध्ये आपण सक्षम आहोत. देशाविरोधात जाणा-यांना धडा शिकवण्याची ताकद आपल्याकडे आहे'.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशाच्या गौरवासाठी हजारो लोकांनी बलिदान दिलं, यातना-दु:ख सोसले, त्या सर्व वीरांना सव्वाकोटी देशवासियांतर्फे नमन करतो, असेही उद्गार यावेळी पंतप्रधान मोदींनी काढले.
विकासाच्या शर्यतीत आपण सर्व एकत्रितरित्या पुढे जाण्यासाठी काम करुया. जीएसटीमुळे देशाची कार्यक्षमता 30 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत डिजिटल देवाण-घेवाणीत 34 टक्के वाढ झाली आहे. जीएसटीमुळे वेळेसोबतच हजारो कोटीही वाचले आहेत. देशाला ट्रॅकवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र असे करत असताना गती कमी होऊ देणार नाही, असे पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले. हा देश बुद्धांचा आहे, गांधीचा आहे, येथे आस्थेच्या नावाखाली होणारा हिंसाचार खपवून घेणार नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कट्टरतावाद्यांना खडसावले आहे.