नवी दिल्ली : फ्रान्सच्या पॅरिसवरील हल्ल्यानंतर इस्लामिक स्टेटस् आॅफ इराक अॅण्ड सिरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेकडून असलेल्या धोक्याबद्दल भारत सतर्क असल्याची ग्वाही केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी मंगळवारी दिली. दरम्यान, या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली आणि मुंबईसह देशभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.नवी दिल्लीतील परदेशी दूतावास व वकिलातींच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. गृहमंत्री राजनाथसिंग यांनी येथे एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, इसिसचा धोका कोणत्याही एका ठराविक देशाला नव्हे तर संपूर्ण जगाला आहे. भारतावरही हल्ला होऊ शकतो. पण त्याबाबतीत सरकार पूर्णपणे सतर्क आहे. येथील सर्व दूतावास, उच्चायोग आणि देशाच्या विविध शहरांमधील वाणिज्य दूतावासांबाहेर सतर्कता वाढविण्यासोबतच अतिरिक्त पोलीस तैनात करण्यास सांगण्यात आले आहे. प्रामुख्याने ब्रिटन, जर्मनी, रशिया, आॅस्ट्रेलिया, तुर्कस्तान व इस्रायलच्या दूतावासांना खास सुरक्षा कवच प्रदान करण्यात आले आहे.देशातील सुरक्षा संस्थांच्या माहितीनुसार, जवळपास २० भारतीय इराक आणि सिरियात इसिसच्या बाजूने हिंसाचारात सामील झाले आहेत. त्यात महाराष्ट्राच्या कल्याणमधील दोन आणि तेलंगणाचा एक युवक, आॅस्ट्रेलियातील एक काश्मिरी, कर्नाटकातील एक व्यक्ती तसेच ओमान व सिंगापूर येथील प्रत्येकी एका भारतीयाचा समावेश आहे.गेल्यावर्षी सहा महिने इसिससोबत राहिल्यावर कल्याणचा एक युवक मायदेशी परतला होता. त्याला मुंबईत अटक करण्यात आली.
भारत इसिसच्या धोक्याबाबत सतर्क
By admin | Published: November 18, 2015 3:34 AM