नवी दिल्ली :भारत आणि चीन सध्या लडाखमध्ये आमनेसामने आले आहेत. गेल्या एक महिन्यापासून दोन्ही देशांत तणावाचे वातावरण आहे. संबंधित वाद मिटवण्यासाठी दोन्ही देशांत चर्चा सुरू आहे. मात्र, असे असले तरी भारत थोडीही उनीव ठेऊ इच्छित नाही. यामुळे कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारताने लडाखजवळील 'लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल'जवळ (LAC) धावपट्टी तयार करण्याच्या कामाला अधिक गती दिली आहे. ही धावपट्टी तयार झाल्यास भारताची लढाऊ विमानं ड्रॅगनच्या नाकाखाली उतरतील आणि नाकाखालूनच उडतील. एवढेच नाही, तर भारताने आपल्या बोफोर्स आर्टिलरी तोफांची तोंडंही आता चीनच्या दिशेनं वळवली आहेत.
येथील अनंतनागजवळ NH-44वर इमरजंसी धावपट्टीचे काम सुरू आहे. कुठलाही बाका प्रसंग उद्भवला तर येथे लढाऊ आणि इतर विमानं उतरवणे सहज शक्य व्हावे यासाठी ही धावपट्टी तयार करण्यात येत आहे.
'लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल'जवळ (LAC) चीननेही विविध प्रकारची कामे केली आहेत. तसेच विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांचीही जमवाजमव सुरू आहे. तर दुसरीकडे भारतही जवळपास 60 बोफोर्स आर्टिलरी तोफा लडाखजवळ फॉरवर्ड पोझिशनवर पाठवत आहे. चीनसोबत सुरू असलेला वाद संपवण्याची आपली इच्छा आहे. मात्र, आपण कुठल्याही स्थितीचा सामना करायलाही तयार आहोत, असे भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले आहे.
दक्षिण कश्मीरमधील बिज्बेहरा भागात NH-44वर हवाई दल धावपट्टी तयार करत आहे. तिची लांबी 3 किमी. एवढी आहे. चीनसोबत सुरू असलेल्या तणावानंतर दोन दिवसांपूर्वीच या धावपट्टीचे काम सुरू झाले आहे. सध्या लॉकडाउन सुरू आहे. मात्र, असे असले तरी या कामासंदर्भातील सर्व प्रकारची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच भारत आणि चीनचे सैन्य लडाखमध्ये तैनात आहे. येथे सर्वप्रथम दोन्ही देशाच्या सैनिकांमध्ये वाद झाला होता. यानंतर चीनने तेथील सैन्य संख्या वाढवली आणि निर्माण कार्याला गती दिली. मात्र, यानंतर दोन्ही देशांत चर्चा सुरू आहे. नुकतीच पहिल्या स्थरावरील बोलनेही पूर्ण झाले आहे. आता वृत्त आले आहे, की चीनी सैनिक सीमेवर दोन किलो मीटर मागे हटले आहेत.
लडाखच्या सीमावर्ती भागात चिनी सैन्य आपले सामर्थ्य दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. भारतीय लष्कराचे जवान देखील त्याच्यासमोर उभे राहिले आहे. दोन्ही बाजूंकडून वाटाघाटीही सुरू आहेत, परंतु अद्याप हा वाद संपलेला नाही. आता पुन्हा एकदा दोन्ही देशांच्या लष्करांची चर्चा होणार आहे. 6 जून रोजी ही बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत दोन्ही देशांच्या सैन्याचे लेफ्टनंट जर्नल रँकचे अधिकारी भाग घेतील.