नवी दिल्ली: भारत-चीन सीमेवर सध्या सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचे लष्कर प्रमुख एम.एम. नरवणे यांनी सीमेवरची परिस्थिती नियंत्रणात असल्याचे असल्याचे शनिवारी सांगितले.
भारत-चीन सीमेवरील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाखाली असल्याचे मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. कोर कमांडर स्तरावरील चर्चेला सुरुवात झाली आहे. आमच्यात चर्चेची एक मालिका सुरू आहे, असे लष्कर प्रमुख एम.एम. नरवणे यांनी सांगितले. तसेच, ते म्हणाले, "आम्ही आशा करत आहोत की, सतत होणाऱ्या संवादाच्या माध्यमातून आपण सर्व मतभेद दूर करण्यास यशस्वी होऊ. सर्व काही नियंत्रणात आहे."
वृत्तसंस्था एएनआयच्या माहितीनुसार, लष्कर प्रमुख एम.एम. नरवणे यांनी भारत-नेपाळ सीमेबद्दल भाष्य केले. नेपाळशी आपले संबंध मजबूत आहेत. आमच्यामध्ये भौगोलिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि धार्मिक संबंध आहेत. आपल्या लोकांमध्ये परस्पर संबंध खूप मजबूत आहेत. नेपाळशी आपले संबंध नेहमीच मजबूत राहिले आहेत आणि भविष्यातही ते मजबूत राहतील, असे लष्कर प्रमुख एम.एम. नरवणे यांनी सांगितले.
याचबरोबर, जम्मू-काश्मीरमध्येही आम्हाला चांगले यश मिळाले आहे. गेल्या 10-15 दिवसांत 15 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेल्या सर्व सुरक्षा दलांमधील जवळचे सहकार्य आणि समन्वयामुळे हे सर्व शक्य झाले आहे. बहुतेक ऑपरेशन स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे करण्यात आले आहेत. त्यामुळे असे दिसून येते की, स्थानिक लोकही अतिरेकी आणि दहशतवादाला कंटाळले असून परिस्थिती सामान्य असावी अशी त्यांची इच्छा आहे, असे लष्कर प्रमुख एम.एम. नरवणे यांनी सांगितले.
दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी पूर्व लद्दाख आणि सिक्किम, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशातील इतर अनेक भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानांचा आढावा घेतला. तर दुसरीकडे, भारत आणि चीनच्या यांच्यातील सीमावादावर तोडगा काढण्यासाठी मेजर जनरल स्तरावरील चर्चेची आणखी एक बैठक पार पडली आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कर प्रमुख एम.एम. नरवणे यांनी संरक्षणमंत्री यांना उच्चस्तरीय बैठकीत पूर्व लडाखमधील संपूर्ण परिस्थितीची सविस्तर माहिती दिली आहे. या बैठकीला सीडीएस बिपिन रावत, नौदल अध्यक्ष अॅडमिरल कर्मबीर सिंह आणि हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया उपस्थित होते.
लडाखमधील पाँगोंग सो, गलवान घाटी, देमचोक आणि दौलत बेग ओल्डी या भागात पाच आठवड्यांपेक्षा जास्त काळ भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये तणाव सुरु आहे. दोन्ही देशांनी उत्तर सिक्कीम, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशात एलएसीवर अतिरिक्त सैन्य तैनात केले आहे.
आणखी बातम्या...
नवजात बाळाच्या हृदयात 3 ब्लॉक; आदित्य ठाकरेंनी उपचारांसाठी केली 'लाख'मोलाची मदत
CoronaVirus Treatment : HCQ सोबत अॅझिथ्रोमायसिनचा वापर घातक; काय होतोय परिणाम? वाचा...
'या' राज्यात पुन्हा लॉकडाऊन; वीकेंडला संपूर्ण राज्य बंद राहणार, सीमाही सील होणार
स्कीन लोशनऐवजी आले 19 हजारांचे Headphones; नंतर सांगितले “नॉन-रिटर्नेबल”