India-China Conflict : अरुणाचल प्रदेशात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाल्याची बातमी समोर आली आहे. 9 डिसेंबर रोजी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये ही झटापट झाल्याची माहिती आहे. या झटापटीत 20 ते 30 सैनिक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेवर आता गृहमंत्री अमित शहा यांनी मोठी माहिती दिली.
काय म्हणाले अमित शहा?'आज देशात भाजपचे सरकार आहे. जोपर्यंत आपले सरकार आहे, तोपर्यंत भारताच्या 1 इंच जमिनीवरही कोणी कब्जा करू शकत नाही. 8 तारखेच्या रात्री आणि 9 तारखेला सकाळी आपल्या सैन्याच्या जवानांनी दाखवलेल्या शौर्याचे मला कौतुक वाटते. सैन्याने काही वेळातच घुसलेल्या सर्व लोकांचा पाठलाग केला आणि आपल्या भारत भूमीचे रक्षण केले,' अशी माहिती शहा यांनी दिली.
लोकसभेत गदारोळ...आज लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास चालू न दिल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर टीका केली. या कृत्याचा मी निषेध करतो, असे शह म्हणाले. संसदीय कामकाज मंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तवांगच्या मुद्द्यावर संसदेत निवेदन देणार आहेत. यावेळी मी प्रश्नोत्तराच्या तासाची यादी पाहिली आणि प्रश्न क्रमांक 5 पाहिल्यानंतर मला काँग्रेसची खरी चिंता समजली. त्यातील एक प्रश्न राजीव गांधी फाउंडेशन (आरजीएफ)चा फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन अॅक्ट (एफसीआरए) परवाना रद्द करण्याबाबत होता.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, विरोधी पक्षांनी विशेषत: काँग्रेसने अरुणाचल प्रदेशातील तवांगमधील घटनांचा संदर्भ देत मौल्यवान प्रश्नोत्तराचा तास वाया घातला. 12 वाजता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सभागृहात या विषयावर आपले म्हणणे मांडणार होते, त्यामुळे प्रश्नोत्तराचा तास पुढे ढकलण्यात काही अर्थ नव्हता. राजीव गांधी फाऊंडेशनला संशोधनाच्या नावाखाली चिनी दूतावासाकडून 1.35 कोटी रुपये मिळाले. मनमोहन सिंग यांच्या अरुणाचल दौऱ्यावर चीनने आक्षेप घेतला होता, हा तुमच्या संशोधनाचा विषय होता का? अशी टीका शहा यांनी काँग्रेसवर केली.