India-China Conflict: अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये असलेल्या 'वास्तविक नियंत्रण रेषेवर' (LAC) चीनसोबत नुकत्याच झालेल्या चकमकीवर पहिल्यांदाच भारतीय लष्कराचे वक्तव्य समोर आले आहे. ईस्टर्न कमांडचे चीफ ऑफ स्टाफ राणा प्रताप कलिता म्हणाले की, आपल्या भारतीय सैन्याने तवांग सेक्टरमध्ये चिनी सैन्याचा अतिशय जोरदार मुकाबला केला. यात काही जवानांना किरकोळ दुखापत झाली आहे.
राणा प्रताप कलिता पुढे म्हणाले की, कोणत्याही खोट्या बातम्यांच्या आहारी जाऊ नका, आमचे सीमेवर पूर्ण नियंत्रण आहे. बुमला येथे ध्वज बैठक घेऊन हे प्रकरण सोडवले गेले आहे. दोन्ही देशांचे सैन्य माघारी परतले असून, परिस्थिती आमच्या नियंत्रणात आहे. अशी माहिती त्यांनी दिली.
सीमेवर हवाई दलाचा सरावपूर्व लडाखमध्ये सुरू झालेल्या वादानंतर लष्कर आणि हवाई दलाने अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम प्रदेशातील LAC वर दोन वर्षांहून अधिक काळापासून तयारी सुरू केली आहे. चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हवाई दलाने गुरुवारी ईशान्य भागात मोठा सराव सुरू केला आहे. या सरावात राफेल लढाऊ विमानांचाही समावेश आहे.
तवांगमध्ये काय घडलं?9 डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशातील वास्तविक नियंत्रण रेषेचे (LAC) विवादित ठिकाण तवांग सेक्टरच्या यांगत्सेमध्ये भारतीय आणि चिनी गस्त घालत होते. यादरम्यान दोन्ही देशांचे सैन्य पुढे आले. या चकमकीत दोन्ही बाजूचे सैनिक जखमी झाले. काही मिनिटांतच हाणामारी वाढली. दोन्ही सैन्याने अतिरिक्त लष्करी मदतीची मागणी केली. सुमारे 250 सैनिक चीनच्या बाजूने आले होते आणि सुमारे 200 सैनिक भारताकडून आले होते. हाणामारी वाढली तेव्हा दोन्ही बाजूंचे वरिष्ठ अधिकारी रिंगणात उतरले आणि वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.