India China Face Off: कम्युनिस्ट पक्षाचे निमंत्रण; भाजप नेत्यांचाही चीन दौरा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 06:00 AM2020-06-20T06:00:13+5:302020-06-20T06:01:11+5:30

आरोप-प्रत्यारोप : राष्ट्रीय ते प्रदेशाध्यक्षांनाही ‘सीपीसी’कडून रेड कार्पेट

India China Face Off BJP leaders visited China on Communist Party Invitation | India China Face Off: कम्युनिस्ट पक्षाचे निमंत्रण; भाजप नेत्यांचाही चीन दौरा

India China Face Off: कम्युनिस्ट पक्षाचे निमंत्रण; भाजप नेत्यांचाही चीन दौरा

Next

- टेकचंद सोनवणे

नवी दिल्ली : गलवान खोऱ्यात भारत चीनविरुद्ध धगधग सुरू असताना सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबीत पात्रा यांनी काँग्रेसने चिनी कम्युनिस्ट पक्षासमवेत सहकार्य करार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. प्रत्यक्षात कम्युनिस्ट पक्षाच्या निमंत्रणावरून दरवर्षी भारतीय जनता पक्षाचे नेते, प्रवक्ते, खासदारही नियमितपणे चीनला भेट देतात. अर्थात, काँग्रेस, भाजप, माकप, भाकप नेत्यांनी चीनला जाणे ही सरकारी कक्षेबाहेरची प्रक्रिया असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयातील एका अधिकाºयाने दिली. २००८ साली तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कम्युनिस्ट पक्षासमवेत करार केल्याचा आरोप पात्रा यांनी केला होता. भाजपने मात्र चिनी कम्युनिस्ट पक्षासमवेत कोणताही करार केलेला नाही.

भारत-चीनमधील सीमा वादात आता काँग्रेस पक्ष केंद्रस्थानी आला. मात्र, असे करार १९९० पर्यंत रशिया एकसंघ असताना तेथील कम्युनिस्ट पक्षासमवेतही होत असत. ज्यात परस्परांची विचारधारा, कार्यपद्धती जाणून घेणे हा उद्देश असे. तत्कालीन भाजपाध्यक्ष नितीन गडकरीदेखील २०१२ साली कम्युनिस्ट पक्षाच्या निमंत्रणावरून चीनला गेले होते. भाजप नेते राम माधव यांचा चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांशी नियमित संवाद असतो. विशेष म्हणजे केवळ कम्युनिस्ट पक्षाच्याच नव्हे, तर चिनी सरकार, विविध विद्यापीठेदेखील भाजप नेत्यांना निमंत्रित करीत असतात. तेथील स्थानिक अधिकारी, विद्यापीठातील अभ्यासकदेखील अधिकृतपणे कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य असतात. अशा संस्थांच्या निमंत्रणावरून गतवर्षी भाजप खासदार व पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह, रावेरच्या खासदार रक्षा खडसे, ग्वाल्हेरचे खासदार विवेक शेजवलकर यांच्या शिष्टमंडळाने चीनचा दौरा केला होता.

अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे कोणत्याही घटनात्मक पदावर नसलेल्या दिल्ली भाजप युवा मोर्चाच्या सरचिटणीस नीतू डबास, भाजप चंदीगड अध्यक्ष संजय टंडन, प्रवक्ते गोपाल अगरवाल व अशोक गोएल यांचाही या शिष्टमंडळात समावेश होता. केवळ राजकीय नेते या एकमात्र निकषावर हे नेते या दौºयात सहभागी झाले होते.

गाँगदाँग इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल स्ट्रॅटेजिसच्या निमंत्रणावरून भारत थिंक टँक डेलिगेशनने १३ ते २३ डिसेंबर २०१६ दरम्यान चीनच्या गाँगझू प्रांताचा दौरा केला होता. यात भाजपचे ज्येष्ठ नेते व प्रवक्ते माधव भंडारी यांचा प्रमुख सहभाग होता. गाँगदाँग विद्यापीठाचे उपाध्यक्ष व कम्युनिस्ट पक्षाचे सचिव सुई गाँगजिउंग यांनी भारतीय थिंक टँक डेलिगेशनचे स्वागत चीनमध्ये केले होते.

काँग्रेसचे तत्कालीन सरचिटणीस राहुल गांधी यांना फेब्रुवारी २०१७ साली चिनी कम्युनिस्ट पक्षाने निमंत्रित केले होते. तेथील गरिबी निर्मूलन कार्यक्रमाची माहिती घेण्यासाठी राहुल गांधी चीनला जाणार होते.
तत्कालीन लोकसभा खासदार राजीव सातव यांच्याकडे या दौºयासाठी अभ्यासपूर्ण अहवाल देण्याची जबाबदारी राहुल गांधी यांनी सोपवली होता. मात्र, ऐनवेळी हा दौरा रद्द झाला होता.

Web Title: India China Face Off BJP leaders visited China on Communist Party Invitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.