जम्मू : या संघर्षाची सुरुवात सोमवार दुपारपासूनच झाली होती. चर्चेमध्ये ठरल्यानुसार ठराविक हद्दीपर्यंत माघार घ्यावी, असा भारतीय सैनिकांनी आग्रह ठरला तेव्हा चिनी सैनिकांनी हाणामारी सुरू केली. भारतीय शहिदांमध्ये बिहार रेजिमेंटचा एक कर्नल, एक सुभेदार (जेसीओ) व एक तामिळनाडूचा रहिवासी असलेला के. पलानी नावाचा जवान आहे. भारतीय सैनिकांनी दिलेल्या प्रखर प्रत्युत्तरात चीनचेही अनेक जवान मृत व जखमी झाले आहेत. काही वृत्तसंस्थांच्या बातमीनुसार चीनने त्यांचे पाच सैनिक मारले गेल्याचे मान्य केले आहे.हा संघर्ष जेथे झाला त्याच ठिकाणी मंगळवारी सकाळी दोन्ही सैन्यदलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्फोटक परिस्थिती निवळण्यासाठी चर्चा सुरू केली. दिल्लीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांसह वरिष्ठ पातळीवर बैठकीत सीमेवरील ताज्या परिस्थितीचा आढावा घेतला.भारत व चीन यांच्यात नक्की सीमाबंदी झालेली नसल्याने गेली ७० वर्षे सीमावाद सुरू आहे. सुमारे ३,५०० किमीची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ही अस्थायी सीमा मानली जाते. लडाखच्या सीमाभागात भारतीय सैन्य रस्त्यांसारखी काही पायाभूत सुविधांची कामे करत आहे. परंतु तो प्रदेश आपला असल्याचे सांगून चीन वाद उकरून काढत आहे.गेल्या पाच आठवड्यांत पॅनगाँग सरोवर, गलवान खोरे, दौलत बेग औल्डी आदी भागांवरून दोन्ही सैन्यांमध्ये तणातणी व हाणामारी होऊन तणाव निर्माण झाला होता. चीनने सीमेवरील लष्करी कुमक वाढविल्यानंतर भारतानेही वाढविली. परंतु नंतर लष्करी व राजनैतिक पातळीवर चर्चा होऊन सैन्य माघारीवर सहमती झाली. परंतु दरम्यानच्या काळात सीमेवर आणलेले जास्तीचे १० हजाराचे सैन्य वादरेषेच्या मागे घेण्यास चीन टाळाटाळ करत असल्यावरून पुन्हापुन्हा वादाचे मुद्दे उपस्थित होत आहेत.संरक्षणमंत्र्यांनी घेतला आढावासंरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी मंगळवारी सकाळी वरिष्ठ पातळीवर बैठक घेऊन सीमेवरील ताज्या परिस्थितीचा समग्र आढावा घेतला. भारताच्या हिताला बाधा पोहोचेल अशा चीनच्या कोणत्याही आगळिकीला सडेतोड उत्तर दिले जाईल, अशी ग्वाही यावेळी तिन्ही सैन्यदलांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. बैठकीला तिन्ही सैन्यदलांचे संयुक्त प्रमुख (सीडीएस) जनरल बिपिन रावत, लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे, हवाईदलप्रमुख एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंग भादुरिया व नौदलप्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग यांच्यासह वरिष्ठ सैन्याधिकाऱ्यांखेरीज परराराष्ट्रमंत्री एस. जयशंकरही उपस्थित होते. लष्करप्रमुख नरवणे मंगळवारी पठाणकोट लष्करीतळास भेट देणार होते. परंतु ताज्या परिस्थितीमुळे दौरा रद्द करून ते दिल्लीतच थांबले.तणाव निवळण्यासाठी दोन्ही सैन्यांमध्ये चर्चाया घटनेनंतर लगेचच तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशांच्या सैन्याधिकाºयांमध्ये मंगळवारी दुपारी चर्चेसाठी सीमेवर संघर्षाच्या जागीच बैठक सुरू झाली. भारताच्या वतीने त्यामध्ये कारू येथे मुख्यालय असलेल्या इन्फन्ट्री डिव्हिजनचे कमांडर मेजर जनरल अभिजीत बापट तर चीनच्या वतीने त्यांचे समकक्ष सैन्याधिकारी सहभागी झाले.पानगाँग त्सो सरोवर, गवलान खोरे व त्याच्या शेजारच्या सीमाभागात दोन्ही सैन्यांमध्ये तणाव झाल्यापासून अशा प्रकारची ही सहावी बैठक होती. सर्वात वरिष्ठ पातळीवरील लष्करी बैठक भारतीय लष्कराच्या लेह येथील कमांडर लेफ्ट. जनरल रहिंदर सिंग व चीनच्या तिबेट लष्करी विभागाचे प्रमुख मेजर जनरल लिऊ लिन यांच्यात सात तास झाली होती.
India China Face Off: सोमवारी दुपारपासूनच सीमेवर संघर्षाला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 3:19 AM