- एस. के. गुप्ता नवी दिल्ली : भारत आणि चीनमधील वादाचे रूपांतर रक्तपातात होत असताना आता चीनला प्रत्युत्तर द्यावे लागेल, असे मत संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि माजी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. भारत आता १९६२ चा देश राहिलेला नाही. खूप बदल झाला आहे. आम्हाला प्रॅक्टिकल व्हावे लागेल, असे मतही या तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.माजी सैन्यप्रमुख जनरल विक्रम सिंह म्हणाले की, चीनची भूमिका पहिल्यापासूनच आक्रमक झाली आहे. या हल्ल्यात दगड आणि काठ्यांचा उपयोग करण्यात आला आहे. देशाचे जवान सीमेवर पहारा देत आहेत. भारताच्या क्षमतेचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा आशियाचा विचार केला तर या भागात दोनच प्रबळ देश आहेत. ते म्हणजे भारत आणि चीन. चीनने हे समजून घ्यावे की, भारत आता १९६२ चा देश राहिलेला नाही. चीनच्या डोळ्यात डोळे घालून आज आम्ही पाहू शकतो.माजी विंग कमांडर प्रफुल बक्शी म्हणाले की, या घटनेनंतर आमचे हवाई दल सज्ज आहे. आमचे कमांडर तयार आहेत. देशातील सरकारला एकच सांगणे आहे की, कधी तरी पुढाकार घ्या. जर आता काही केले नाही तर चीन आम्हाला दाबून टाकेल. तसा प्रयत्न करेल. त्यासाठी प्रत्युत्तर देणे गरजेचे आहे.निवृत्त ले. कर्नल शैलेंद्र सिंह याबाबत बोलताना म्हणाले की, आमच्या भूमिकेमुळे चीन त्रस्त आहे. भारताने आपल्या सीमेच्या सुरक्षेसाठी तयारी केली आहे. चीनने सैन्य तैनात केले तर भारतानेही सैन्य तैनात केले. पंजाब रेजिमेंट अतिशय क्रोधात आहे. या रेजिमेंटचा संयम ढळला तर सांभाळणे अवघड होईल. चीनने आमचे तीन सैनिक मारले तर आम्हाला त्यांना उत्तर द्यावे लागेल. अन्यथा, आमच्या सैनिकांचे मनोबल कमी होईल.चीनने फायर अलार्मचा उपयोग केला आहे. जो की, चुकीचा आहे. चीनने म्हटले होते की, चर्चेत ठरले होते तसे वागू. अंतिम क्षणी चिनी सैनिकांचे परत जाणे हे दर्शविते की, नजर भिडवून ते मागे हटले आहेत; पण नंतर त्यांनी पुन्हा डोळे वटारले आहेत. चीनला असे वाटत आहे की, आपली क्षमता दाखविण्यासाठी हा सुवर्ण क्षण आहे. चीनच्या सैन्याचा हा राजकीय कट आहे.- तेज टिक्कू, निवृत्त कर्नल, संरक्षणतज्ज्ञ.व्हिएतनामनंतर चीनने कुणासोबत युद्ध केलेले नाही. भारत दक्षिण आशियाची महाशक्ती आहे. चीन सध्या भारताला दाबण्याची रणनीती खेळत आहे. कोरोनाच्या मुद्यावरून जगाचे लक्ष विचलित करण्याच्या प्रयत्नात चीनने चुकीचे पाऊल उचलले आहे. भारताला याचे उत्तर द्यावे लागेल.- संतपाल राघव, निवृत्त कर्नलचीनच्या या कृतीचे उत्तर चर्चेने नाही तर आपल्या ताकदीने द्यावे लागेल. या झटापटी २०११ पासून सुुरू आहेत. पुढे जाऊन हे गंभीर होईल, असा अंदाज होताच. मात्र, याचे रूपांतर खुनी संघर्षात होणे आणि जवान शहीद होणे हे दर्शविते की, आता वेळ आली आहे. कारण, चीन प्रोटोकॉल मानत नाही.- राकेश शर्मा, निवृत्त ले. जनरलचीन आणि भारतात लहान-मोठ्या झटापटी होत असतात; पण अशी मनुष्यहानी कधी झाली नाही. आम्हाला प्रॅक्टिकल व्हावे लागेल. एसी आॅफिसमध्ये बसून आम्ही सैन्याचे हात बांधू नयेत. अन्यथा, २०-२५ सैनिक तुम्ही गमावून बसाल. त्यांच्या कुटुंबाला फरक पडतो. दीड महिन्यापासून चर्चा होत आहे आणि हे सर्व वाढत आहे. सैनिकांकडे शस्त्र आहेत, तर सुरक्षेसाठी त्याचा वापर करण्यासाठी सांगावे.- जी. डी. बक्शी, निवृत्त मेजर जनरलकोण झाले शहीद?चीनच्या या हल्ल्यात १६ बिहार रेजिमेंटचे कर्नल संतोष बाबू व एम. पलानी आणि कुंदन ओझा हे दोघे जवान शहीद झाले. कर्नल बाबू मूळचे तमिळनाडूचे तर पलानी व ओझा हे अनुक्रमे तमिळनाडू व झारखंडचे आहेत. त्यांच्या हौतात्म्याची सूचना कुटुंबियांना लष्कराकडून अधिकृतपणे देण्यात आली. कर्नल बाबू गेले दीड वर्ष चीनच्या सीमेवर तैनात होते व गेल्या डिसेंबरमध्येच त्यांनी ९ रजिमेंट तुकडीचे कमांडिंग आॅफसर म्हणून सूत्रे हाती घेतली होती. ओझा २२ वर्षे लष्करात होते.
India China Face Off: भारत आता १९६२ चा देश राहिलेला नाही; चीनला प्रत्युत्तर देण्याची गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 3:29 AM