नवी दिल्ली - भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे चीनच्या बीजिंग दौऱ्यावर जाणार आहेत. भारतासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. अलीकडेच २४ ऑक्टोबरला ब्रिक्स शिखर संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट झाली होती. त्यानंतर हा दौरा होतोय. LAC सीमेवरील वादावर तोडगा आणि दोन्ही देशातील संबंध सुधारण्यावर या बैठकीत चर्चा होऊ शकते.
सरकारी सूत्रांनुसार, LAC वर साम्यंजस्य तोडग्यासाठी ही बैठक महत्त्वाची आहे. बुधवारी डोवाल चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी चर्चा करतील. जवळपास ५ वर्षांनी पहिल्यांदाच अशाप्रकारे बैठक होत आहे. या दोन्ही देशातील शिष्टमंडळाची भेट याआधी डिसेंबर २०१९ मध्ये झाली होती. २०२० मध्ये लडाख वादावरून भारत आणि चीन यांच्यातील संबंध ताणले गेले होते. सध्या या वादावर ७५ टक्के तोडगा निघाला आहे. लवकरच पूर्णपणे समाधान निघणार आहे अशी माहिती भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिली होती.
चीनने डोवाल यांच्या दौऱ्यावर काय म्हटलं?
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी म्हटलं की, चीन भारतासह मिळून दोन्ही देशातील नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक होत असून द्विपक्षीय संबंध आणि वाद मिटवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. एकमेकांच्या मुख्य हितसंबंधांचा आणि समस्यांवर निरसन करणे, संवादाद्वारे परस्पर विश्वास मजबूत करणे आणि प्रामाणिकपणा आणि सद्भावनेने योग्यरित्या मतभेद सोडवणे यावर भर दिला जाईल. एप्रिल २०२० नंतर पूर्व स्थितीकडे परत जाणे हे समाधानाच्या दिशेने पहिले पाऊल असेल, असे भारताने यापूर्वीच अनेकदा सांगितले आहे. G20 व्यतिरिक्त, BRICS, SCO आणि Quad मध्ये भारताच्या महत्त्वामुळे चीनलाही माघार घ्यायला भाग पाडले आहे. आता या चर्चेनंतर दोन्ही देशांमधील संबंध कितपत सुधारतात हे पाहायचे आहे.
दरम्यान, मागील काही काळापासून चीनच्या वागणुकीत बदल झाल्याचं चित्र आहे. शांततेच्या दृष्टीने ते सकारात्मक पाऊल उचलत आहेत. रशियात पंतप्रधान मोदींसोबत जिनपिंग यांची भेट झाली. आता अजित डोवाल चीनमध्ये जात आहेत. भारतासोबत कुठलाही तणाव राहू नये या दृष्टीने चीनच्या हालचाली सुरू आहेत. चीनची ही वागणूक अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार आल्यापासून आहे. ट्रम्प हे चीनचे कट्टर विरोधक राहिलेत. २० जानेवारीपासून ते अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदावर बसतील. त्यानंतर अमेरिकेत व्यापाराच्या क्षेत्रात अनेक धोरणात्मक बदल होतील अशी चर्चा आहे. त्यात भारतात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून पुढे येतेय. भारतात मोठी बाजारपेठ आहे. पाश्चिमात्य देशांना टक्कर देण्यासाठी चीनला भारत आणि रशियासोबत मैत्री ठेवणे ही त्यांची मजबुरी आहे त्यामुळे भारत आणि चीन यांच्यात बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे.