नवी दिल्ली : चीनच्या सुमारे २०० सैनिकांनी अरुणाचल प्रदेशमधील तवांग भागात भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा केलेला प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला. त्यावेळी भारतीय जवानांनी काही चिनी सैनिकांना ताब्यातही घेतले होते. ही घटना गेल्या आठवड्यात घडली. या आधी गलवान खोऱ्यामध्ये घुसखोरी करणाऱ्या चिनी सैनिकांना भारतीय लष्कराने मोठा दणका दिला होता.
आपापसातले मतभेद मिटविण्यासाठी भारत व चिनी लष्कराच्या काॅर्प्स कमांडरमधील चर्चेची फेरी पुढची फेरी लवकरच पूर्व लडाखमध्ये होण्याची शक्यता आहे. त्या आधीच अरुणाचल प्रदेशमध्ये चीनकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाला आहे. अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर बुमला व यांगत्से या परिसरात चीनच्या सैनिकांनी घुसखोरी करण्याचा व भारतीय हद्दीतील रिकामे बंकर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले व काही चिनी सैनिकांना ताब्यातही घेतले होते. त्यानंतर, चिनी व भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चर्चा होऊन ताब्यात असलेल्या चिनी सैनिकांना सोडून देण्यात आले. अरुणाचल प्रदेशमधील घटनेत भारतीय लष्कराची कोणतीही हानी झालेली नाही.