नवी दिल्ली - भारत आणि चीन यांच्या संघर्षात देशाचे २० जवान शहीद झाल्यानं देशभरात संतापाची लाट उसळली आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या भारतीय आणि चीनी सैनिकांच्या झटापटीत दोन्ही देशाच्या जवानांची हानी झाली आहे. रात्रीच्या अंधारात झालेल्या या संघर्षात भारताचे जवळपास २४ जवान आताही मृत्यूशी झुंज देत असल्याची सूत्रांची माहिती आहे.
भारताच्या जवळपास ११० सैनिकांना उपचारांची गरज आहे. या प्रकरणाची माहिती घेणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, देशातील शहीदांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. विश्वासघातकी चीनने सोमवारी रात्री नि:शस्त्र भारतीय सैनिकांवर गलवान खोऱ्यात योजनाबद्ध हल्ला आहे. लोखंडाच्या सळ्या, दांडकी, काटेरी जाळ्या या हत्यारासह बिहार रेजीमेंटच्या जवानांवर चीनी सैनिकांनी हल्ला केला.
एका इंग्रजी वेबसाईटनुसार हॉस्पिटलमधील जखमी जवानांची माहिती असणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले आहे की, चीनी सैनिकांनी डोंगरावरुन नि:शस्त्र सैनिकांना शोधत त्यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या चीनच्या हल्ल्यामुळे भारतीय सैनिक हैराण झाले त्यानंतर भारतीय सैनिकांनी त्याला सडेतोड उत्तर दिले. काही जवान डोंगराच्या टेकडीवर पोहचले आणि तिथून खाली पडले त्यांच्यासोबत चिनी सैनिकही खाली पडले.
कर्नल संतोष बाबू यांनी चीनी सैनिकांना पेट्रोल पॉईंट १४ जवळील टेंट हटवण्यास सांगितला, दोन्ही देशाच्या सैन्य स्तरावरील बैठकीत हा परिसर रिकामा करण्याबद्दल सहमती झाली होती. तरीही चीनी सैनिकांनी भारतीय सीमेत पेट्रोल पॉईंट १४ जवळ अस्थायी टेंट बनवला होता. सैनिकांना हा टेंट हटवण्याचे निर्देश दिले होते. पण सैनिकांनी टेंट हटवण्यास नकार दिला. रविवारी याठिकाणी दगडफेकही झाली होती. चीनी सैनिकांनी यासाठी भारतीय सैन्याला जबाबदार धरलं होतं. त्यानंतर सोमवारी रात्री उशिरा चीन आणि भारतीय सैन्यात रक्तसंघर्ष झाला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पॉईंट १४ च्या डोंगराळ भागात चीनचे सैन्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी मोठमोठे दगड भारतीय सैनिकांच्या दिशेने फेकण्यास सुरुवात केली. भारतीय सैनिकांनी या हल्ल्याचा सामना केला. आजूबाजूला संरक्षण करण्याची संधीही मिळाली नाही. सोमवारी सकाळी चीनी सैनिकांनी भारतीय जवानांचे मृतदेह सोपवले. या संघर्षात चीनचे सैनिकही मारले गेले, भारतीय लष्कराच्या माहितीनुसार चीनचे ४० सैनिक मारल्याची चर्चा त्यांच्या सैनिकांमध्ये सुरु आहे.