नवी दिल्ली: वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारत आणि चीनमधील तणाव कमी झाला आहे, मात्र, चिनी सैन्याने अद्याप माघार घेतली नाही. पँगोंग आणि गोगरा भागात चीनचे सैन्य माघारी परतले नाही. या भागात सैनिकांची संख्या कमी करण्यात आली असली तरी अद्यापही दोन्ही देशांचे सैनिक अद्याप तैनात आहेत. मात्र आता चीनला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी चीन सीमेवर आणखी ३५ हजार जवान तैनात करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे.
भारताची चीनला लागून ३,४८८ किलोमीटर इतकी सीमा प्रत्यक्ष ताबा रेषा (LAC) आहे. ही प्रत्यक्ष ताबा रेषा हलवण्याचे चीनचे मनसुबे असल्याने तणाव वाढला आहे. सीमेवर आणखी जवान तैनात करण्यात येणार आहे. परिणामी सैन्याच्या बजेट ताणला गेला आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. दोन्ही देशात यापूर्वी झालेल्या कुठल्याही कराराचे चीनकडून सीमेवर पालन होत नाहीए. यामुळे तणाव आणखी वाढल्याने सीमेवर अतिरिक्त जवानांना तैनात करण्यात येत आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
चिनी सैन्य अजूनही फिंगर -४ च्या रिज भागात तैनात आहे. तर फिंगर -४ मधून माघार घेऊन फिंगर -५ वर आपले लष्कर तैनात आहे. मात्र, गलवान आणि हॉट स्प्रिंग भागात डिसएंगेजमेंटची दुसरी फेरी पूर्ण झाली आहे.
दोन्ही देशांच्या सीमेवरील परिस्थिती आता सुरळीत व शांत होण्याच्या दिशेने आली आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. कमांडर स्तरावरील चर्चेच्या पाचव्या फेरीतील उर्वरित प्रश्न सोडविण्याची तयारी सुरू आहे. कमांडर-स्तरावरील चर्चेच्या चार फेऱ्या झाल्या आहेत आणि सीमा संबंध चर्चा आणि समन्वय यावर तीन बैठका झाल्या आहेत, असेही वांग वेनबिन यांनी सांगितले.