नवी दिल्ली – भारतचीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला. ५ मे रोजी लडाखसह काही भागात चीनच्या सैन्याने घुसखोरी केल्याचं समोर आलं. त्यानंतर तातडीनं सर्वपक्षीय बैठक बोलवायला हवी होती. राष्ट्राची एकता आणि अखंडतेच्या रक्षणासाठी संपूर्ण देश एकसाथ आहे, सरकारद्वारे घेतलेल्या निर्णयाला समर्थन असेल असं सोनिया गांधी यांनी सांगितले.
यावेळी सोनिया गांधी म्हणाल्या की, भारत आणि चीन यांच्या संघर्षातील महत्त्वाच्या बाबींवर आम्ही अंधारात आहोत, लडाखमध्ये चीनी सैन्याने कधी घुसखोरी केली? चीनचे सैन्य घुसले आहे हे सरकारला कधी माहिती पडले? माहितीनुसार ५ मे रोजी ही घुसखोरी झाली? हे खरं आहे का की घुसखोरी त्यानंतर झाली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच सरकारला नियमितपणे आपल्या देशाच्या सीमेची सॅटेलाइट इमेज मिळते का? आपल्या गुप्तचर खात्याला एलएसीजवळ सुरु असलेल्या या कारवायांची माहिती नव्हती का? गुप्तचर यंत्रणेने चीनच्या घुसखोरीची माहिती दिली का? सेनेच्या अधिकाऱ्यांनी एलएसीवर चीनचा कब्जा आणि भारतीय हद्दीत चीनी सैन्याची उपस्थिती याबाबत सरकारला अलर्ट केले नाही का? सरकारच्या गुप्तचर विभागाचं हे अपयश आहे का? या सर्व प्रश्नांची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी द्यायला हवी असं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सांगितले.
दरम्यान, सरकारने एप्रिलपासून आतापर्यंत सर्व माहिती आणि सध्याची परिस्थिती सांगावी, आता यापुढे काय मार्ग आहे? चीनी सैन्याच्या परत जाण्यासाठी काय हालचाली सुरु आहेत? सरकारने हे स्पष्ट करायला हवे. चीन पहिल्याप्रमाणे जुन्या सीमेवर आपलं सैनिक परत बोलावून घेईल का? परिस्थिती पुर्वपदावर येईल का? याबाबत सरकारने आश्वासन द्यायला हवं असं सोनिया गांधी म्हणाल्या.
काय म्हणाले शरद पवार?
. देशाचे संरक्षण मंत्री राहिलेले शरद पवारांनी सांगितले की, सैनिक कधी, केव्हा हत्यार सोबत ठेवणार आणि कुठे नाही हे आंतरराष्ट्रीय करारानुसार निश्चित झालं आहे. अशा संवेदनशील मुद्द्यावर बोलताना आपल्या सावधता बाळगली पाहिजे असं त्यांनी सांगितले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत शरद पवारांनी हे वक्तव्य केले.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
भारताला शांतता हवी आहे. पण याचा अर्थ भारत दुबळा आहे असा होत नाही. चीनचा मूळ स्वभाव हा विश्वासघातचा आहे. भारत बलवान आहे आणि दुबळा नाही. शत्रूचे डोळे काढून हातात देण्याची सरकारमध्ये क्षमता आहे.आपण सगळे एक आहोत. आम्ही पंतप्रधान मोदींच्या सोबत आहोत. लष्कराचे जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
...म्हणून सीमेवर तणाव वाढला; भारत-चीन संघर्षावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खुलासा
"आँखे निकालकर हात में देना"; सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा चीनविरोधात एल्गार
राहुल गांधींच्या ‘त्या’ वक्तव्याचा शरद पवारांकडून समाचार; आंतरराष्ट्रीय कराराची दिली शिकवणी
नेपाळनंतर आता बांगलादेशही भारताच्या विरोधात?; चीनची सर्वात मोठी रणनीती