एकीकडे बांगलादेशात सत्तापालट झाल्यानंतर त्याचे परिणाम भारतावर होत आहेत तर दुसरीकडे ड्रॅगन चीननेही सीमेवर भारताविरोधात षडयंत्र रचण्यास सुरुवात केली आहे. लडाखच्या वास्तविक नियंत्रण रेषेजवळ चीनच्या सैन्यानं सहा नवीन हेलीस्ट्रिप बनवल्या आहेत. सॅटेलाईट फोटोतून याबाबतचा खुलासा झाला आहे. ज्या जागेवर या हेलीस्ट्रिप बनवण्यात आल्यात. ती जागा वेस्टर्न तिबेटमध्ये आहे. लडाखच्या डेमचोकपासून हे हेलीस्ट्रिप १६० किमी अंतरावर आहे ज्यामुळे धोका आणखी जास्त वाढला आहे. सध्या भारत सरकारकडून यावर कुठलीही प्रतिक्रिया आली नाही.
गेयायी नावाच्या जागेवर हे हेलीस्ट्रिप बनवण्यात आलं आहे. याठिकाणी अद्याप बांधकाम पूर्ण झालं नाही. हेलीस्ट्रिप बनवण्याची सुरुवात एप्रिल २०२४ मध्ये झाली होती. फोटोतून स्पष्ट दिसते की, इथं ६ हेलीस्ट्रिप तयार केले जात आहेत. त्याचा अर्थ इथून १-२ नव्हे तर ६ ते १२ हेलिकॉप्टर एकत्रच तैनात केले जाऊ शकतात. ही जागा लडाखच्या डेमचोकपासून १६० किमी आणि उत्तराखंडच्या बाराहोतीहून २०० किमी अंतरावर आहे. डेमचोक येथे भारतीय आणि चीनी सैन्यांमध्ये अनेकदा संघर्ष पाहायला मिळाला आहे.
चीनचं सैन्य नेहमी वास्तविक नियंत्रण रेषेजवळ हेलिपॅड अथवा बांधकाम करत असते. मागील काही वर्षात सीमेजवळील भागात चीननं रस्त्यांचे जाळे बनवले आहे. भारतानेही लडाखच्या चीन सीमेवर देखरेख वाढवली आहे. २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारताने याठिकाणी जवानांची संख्याही वाढवली आहे. या भागात भारताकडून रस्त्यांचे जाळे पसरवले जात आहे. भारताने अनेक अत्याधुनिक शस्त्रेही या भागात ठेवली आहेत.
दरम्यान, चीनचा हा काळा कारनामा पहिल्यांदाच समोर आला नाही. जुलैमध्येही चीनच्या सैन्याकडून पूर्व लडाखच्या पँगोंग सरोवराजवळ खोदकाम सुरू होते. याठिकाणी अंडरग्राऊंड बंकर बनवली जात असल्याचं बोलले जाते जेणेकरून हत्यारे, इंधन, वाहने स्टोअर करण्यासाठी मजबूत शेल्टर बनवलं जाईल. सॅटेलाईट इमेजद्वारे याचाही खुलासा झाला होता. ज्याठिकाणी बंकर बनवलं जात होतं तिथे मे २०२० पासून ओस पडलं आहे. याच भागात चीनचा सिरजाप बेस कॅम्प आहे जिथे सैनिकांच्या राहण्याची व्यवस्था आहे.