नवी दिल्ली – भारताच्या सीमेवर चीननं आतापर्यंत ५०० मॉडेल गाव उभारले आहेत. मॉडेल गावाच्या आडून चीन सैन्याचं बंकर बनवत आहे. गावच्या विकासातून मागून सीमेपर्यंत पक्के रस्ते तयार करुन घेत आहे. तर सिक्किममध्ये भारत, चीन आणि भूतान यांच्यात डोकलाम इथं फेस ऑफनंतर भारत-चीन यांच्या सैन्यात चकमक सुरुच आहे. मागील ६ महिन्यात भारत-चीन दोन्ही सैन्य एकमेकांच्या आमनेसामने आले आहेत. परंतु लष्कराकडून याबाबत कुठलीही माहिती जाहीर करण्यात येत नाही.
गलवान घाटीत झालेल्या घटनेनंतर सिक्किम इथं दोन्ही सैन्य एकमेकांना भिडले. परंतु चीनचा स्वभाव पाहून भारतीय सैन्य पूर्णपणे तयार आहे. डोकलाम फेस ऑफनंतर चीनने सिक्किमजवळील तिबेट इथं स्वत:ची ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. चीनने सिक्किमनजीक २०१७ पासून वेगाने रस्ते आणि बांधकामाला सुरुवात केली आहे. भारतीय लष्करी सूत्रांनुसार, भारत-चीन यांच्यातील तणावाची सुरुवात सिक्किमच्या नाकुला इथं झाली. त्यानंतर डोकलाम आणि गलवान इथे झटापट झाली.
अशावेळी चीनने सिक्किम आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमाभागात वेगाने बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे. डोकलाम इथं चिनींचा डाव उधळला त्यानंतर गलवानमध्येही चीनला पळता भुई केली. त्यामुळे चीनने आता सावध पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. आता चीनने भारत सीमेवर मूळ तिबेटी लोकांना तैनात केले आहे. विशेषत: इतक्या उंचीवर लढाई करण्यासाठी मूळ तिबेटी लोक चिनी सैन्यापेक्षा माहीर आहेत. चीनने भारत सीमेवर मॉडेल व्हिलेज बनवण्यास सुरुवात केली आहे. केवळ उत्तर सिक्किम सीमेजवळ चीनने ३ मॉडेल गाव तयार केले आहेत.
मूळ तिबेटी लोकांना वसवण्याची योजना
या मॉडेल गावात मूळचे तिबेटी असलेल्या लोकांना वसवण्याची योजना आहे. परंतु या मॉडेल गावाचं बांधकाम चीनने अगदी हुशारीने केले आहे. जेणेकरून बंकर म्हणून याचा वापर केला जाऊ शकतो. परंतु भारत चीनच्या या करकुतींना जाणून आहे. त्यामुळे भारतानेही तयारी सुरु केली आहे. उत्तर सिक्किम इथे एकमेव तिबेटी पठार भारतीय सीमेत आहे. याठिकाणी भारतीय बंकर पूर्ण तयारीत आहेत. चीनच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवली जात आहे. प्रत्येक अत्याधुनिक हत्यारं याठिकाणी भारतीय सैन्याला देण्यात आली आहेत.
परंतु या पठारावर केवळ चीनशी मुकाबला नाही तर हवामानही मोठा शत्रू आहे. भारतीय सैन्याचे बंकर १६ हजार ते २० हजार फूट उंचावर आहेत. इतक्या उंचीवर ऑक्सिजनची पातळीही कमी होते. अतिशय थंड वातावरण जीवघेणं ठरू शकतं. त्यासाठी जवानांना विशेष ट्रेनिंग दिली जाते. त्याचसोबत रोटेशनपद्धतीने त्यांची ड्यूटी लावली जाते. याठिकाणी बोफोर्स, अर्जुन टँक तैनात केलेत. भारताची सीमा चार देशांना लागून आहे. भुतान, नेपाळ, बांगलादेश आणि चीन. यात सर्वात धोकादायक चीन आणि सिक्किम सीमेपासून २२६ किमी अंतरावर जास्त धोका आहे.