बीजिंग: गेल्या आठवड्यात लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्याची झटापट झाली. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले. तर चीनचे ३५ ते ४० जवान मारले गेले. मात्र चीननं मृत्यूमुखी पडलेल्या जवानांचा नेमका आकडा जाहीर केलेला नाही. यानंतर परवा (२२ जून) भारत आणि चीनच्या कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यांची चर्चा झाली. त्यानंतर चीननं सैन्य माघारी घेण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे सीमेवरील तणाव निवळण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र प्रत्यक्षात चीनच्या वेगळ्याच हालचाली सुरू आहेत. उपग्रहांनी टिपलेल्या छायाचित्रांमधून चीनचा कावेबाजपणा उघड झाला आहे.गलवान खोऱ्यात सुरू असलेल्या हालचाली उपग्रहांनी टिपल्या आहेत. त्यामधून चीनच्या मनात नेमकं काय सुरू आहे याचा अंदाज येऊ लागला आहे. ओपन सोर्स इंटेलिजन्स ऍनालिस्ट डेट्रेस्फानं गलवान खोऱ्यातील काही छायाचित्रं प्रसिद्ध केली आहेत. गेल्या आठवड्यात भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये झटापट झालेल्या ठिकाणाजवळ सध्या बंकर तयार करण्याचं काम सुरू असल्याचं छायाचित्रांमधून दिसत आहे. या भागात लहान लहान भिंती तयार करण्यात आल्या असून खोदकामही करण्यात आलं आहे. त्यामुळे चीनचा नेमका मानस काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. भारतासोबत संवाद सुरू ठेवून गलवानमध्ये आपली स्थिती मजबूत करण्याचे प्रयत्न चीनकडून सुरू आहेत.
India China Faceoff: चीनकडून पुन्हा भारताचा विश्वासघात?; सॅटेलाईट फोटोंनी टिपला ड्रॅगनचा कावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 3:08 PM