नवी दिल्ली: पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेला तणाव कमी होण्याची शक्यता दिसत नाही. पँगाँग सो, डेपसांगमधून माघार घेण्यास चिनी सैन्यानं नकार दिला आहे. याशिवाय चीननं अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सैनिकांची संख्या वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे दोन्ही देशांत होणारी लष्करी बैठक रद्द करण्यात आली आहे. कमांडर स्तरावरील ही बैठक आठवडाभर पुढे ढकलण्यात आली आहे.१४ कॉर्प्स कमांडर जनरल हरिंदर सिंह आणि चिनी मेजर जनरल लुई लिन यांच्यात ५ व्या फेरीतील चर्चा होणार होती. मात्र चीनचा सीमेवरील पवित्रा पाहता भारतानं या बैठकीसाठी फारसा आग्रह धरला नाही. ३० जुलैला भारत आणि चिनी सैन्यात बैठक होणार होती. पँगाँग सो आणि डेपसांगमधून चीन माघारी न हटण्यामागे दोन कारणं असू शकतात, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. १४ जुलै दोन्ही देशांमध्ये कमांडर दर्जाची चर्चा झाली. ही चर्चेची चौथी फेरी होती. त्यात सैन्य माघारी घेण्यावर सहमती झाली. मात्र त्याच्या अंमलबजावणीवरून अद्याप चीन अद्याप द्विधा मनस्थितीत आहे. यासोबतच चीनला हा वाद हिवाळ्यापर्यंत लांबवायचादेखील आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.पँगाँग सो आणि डेपसांगमधून माघार घेण्यास चीननं दिलेला नकार आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागातील चिनी सैन्याची वाढती संख्या यामुळे भारतीय जवान अलर्टवर आहेत. याशिवाय भारतीय नौदलदेखील सतर्क आहे. हिंदी महासागरातील नौदलाचा वावर वाढला आहे. पूर्व लडाखमधील तणाव दीर्घ काळ चालेल, या अनुषंगानं भारतीय जवान सज्ज झाले आहेत.चीनसोबत ४ वेळा सैन्य स्तरावर चर्चापूर्व लडाखमध्ये शांतता आणि स्थिरता प्रस्थापित करण्याच्या हेतूनं वादग्रस्त भागांमधून सैनिकांनी माघारी घ्यावी यासाठी दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांमध्ये आता चर्चेच्या चार फेऱ्या झाल्या आहेत. ५ जुलैला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात फोनवरून २ तास चर्चा झाली. दोन्ही देशांच्या सैन्यातील तणाव निवळण्याच्या हेतूनं ही चर्चा झाली.
India China FaceOff: पँगाँग सो, डेपसांगमधून मागे हटण्यास चीनचा नकार; सैन्याची पाचव्या फेरीतील बैठक रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2020 7:59 AM