नवी दिल्ली : भारतचीनसोबतचे तणावाचे संबंध निवळण्यासाठी वारंवार प्रयत्न करीत असला तरी चीनने पुन्हा एकदा हटवादी भूमिका घेत पूर्व लडाखमध्ये हॉट स्प्रिंग्स, गोगरा आणि देपसांगच्या संघर्षमय क्षेत्रांतून सैनिकांना माघारी घेण्यास नकार दिला आहे. गेल्या आठवड्यात उभय देशांत ११ व्या फेरीची चर्चा १३ तास चालली. त्यात चीनने या क्षेत्रांतून माघारी जाण्यास नकार दिला.एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पीएलएने गोगरा-हॉट स्प्रिंग्स भागांत एप्रिल २०२० च्या आधीच्या स्थितीत परत जाण्यास नकार दिला आहे. त्याऐवजी चीनने भारतीय लष्कराला विचार करण्यासाठी काही प्रस्ताव दिले आहेत. या क्षेत्रांत सैनिकांना पूर्णपणे मागे जाण्यासाठी आणखी काही वेळ लागेल.चीनला हे स्पष्टपणे हवे आहे की, भारतीय लष्कराने आता प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) पेट्रोलिंग पॉइंट १५ आणि १७ ए वर त्याच्या नव्या स्थितीला स्वीकारावे आणि तो या क्षेत्रांत एप्रिल २०२० च्या आधीच्या स्थितीत जायला आढेवेढे घेत आहे.दुसरा एक अधिकारी म्हणाला की, गोगरा-हॉट स्प्रिंग्स क्षेत्रांत चीनचे जवळपास ६० सैनिक एप्रिल २०२० च्या स्थितीपेक्षा पुढे आले आहेत आणि या क्षेत्राला रिकामे करण्याची प्रक्रिया चीन त्याचे सैनिक मागे घेणार नाही, तोपर्यंत पूर्ण झाली, असे मानले जाणार नाही. एकदा हा टप्पा पूर्ण झाला की, त्यानंतर देपसांग क्षेत्रात भारतीय लष्कराच्या गस्ती अधिकारांच्या मुद्यावर पुढे जाता येईल. हा मुद्दा वर्ष २०१३ पासून आहे.
सैनिकांसाठी पुरवतोय रसद...- हे भाग भारत आणि चीन दोघांसाठी रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचे आहेत. चिनी सैन्य गोगरा, हॉट स्प्रिंग आणि कोंगकाला क्षेत्रातून तैनात आपल्या सैनिकांसाठी मोठ्या प्रमाणावर रसद पोहोचवतो आहे. - लष्करी चर्चेची दहावी फेरी २० फेब्रुवारी रोजी झाली होती. दोन्ही देशांचे सैन्य पैंगोंग झीलच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यांवरून आपापले सैनिक आणि शस्रास्रे माघारी घ्यायला तयार झाले होते. आता मात्र चीन आढेवेढे घेत आहे.