लडाख – पूर्व लडाख परिसरात भारत आणि चीन यांच्यातील संघर्षात नवा वाद निर्माण झाला आहे. सॅटेलाईट इमेजद्वारे चीन पेंगाँग परिसरात मजबुतीने सरोवरावर पूल बांधण्याचा प्रयत्न करत असल्याचा डाव उघडकीस आला आहे. रिपोर्टनुसार, चीनच्या नापाक हरकतीविरुद्ध भारताने २९ ऑगस्ट २०२० रोजी पेंगाँग परिसरात मोठं ऑपरेशन हाती घेतलं होतं. भारतीय सैन्याने रातोरात पेंगाँग तलावाच्या दक्षिणी बाजूस डोंगराळ भागावर कब्जा केला होता. ज्यामुळे चीन हादरला होता.
त्यावेळी चीन पेंगाँग सरोवराच्या उत्तरेस पाय रोवून होते. त्यामुळे इच्छा असूनही चीनला काहीच कारवाई करता आली नव्हती. त्यामुळे भारताची बाजू मजबूत झाली. आता चीनने हा डाव आखून पेंगाँग सरोवरावर पूल बांधण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी चीनने जागा निश्चित केली आहे. ओपन सोर्स इंटेलिजेंसच्या रिपोर्टनुसार, त्या क्षेत्रातील सॅटेलाईट इमेज जारी करण्यात आली आहे. ज्यात पेंगाँगच्या दोन्ही किनाऱ्यांना जोडणारी पूलसदृश्य रचना दिसून येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मोठ्या प्रमाणात होणारी बर्फवृष्टी आणि खराब वातावरण असतानाही चीन या पूलाचं बांधकाम पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करत आहे.
चीन बांधत असलेल्या या पूलाची लांबी ४०० मीटर इतकी आहे. लवकरच हा पूल पूर्णपणे बांधून होईल. त्यानंतर चीनला या परिसरात बळ मिळणार आहे. चीनला हवं तेव्हा पेंगाँग तलावाच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सैन्याला हलवू शकतं. सध्या चीनला पेंगाँगच्या उत्तरेकडील असलेल्या बेस कॅम्पपासून दक्षिणेकडे जाण्यासाठी २०० किमी फिरून यावं लागतं. मात्र या पूलाच्या बांधकामानंतर हे अंतर जवळपास १५० किमीने कमी होणार आहे. त्यामुळे चीनच्या सैन्याची स्थिती आणखी मजबूत होईल. त्याचसोबत पेंगाँगच्या दक्षिण भागावर चीनची पकड मजबूत होण्याची शक्यता आहे.
स्वीडनच्या उप्साला यूनिवर्सिटीचे प्रोफेसर अशोक स्वैन यांनी या स्थितीला चिंताजनक असल्याचं म्हटलं आहे. पेंगाँग तलावाच्या येथील बांधकामामुळे हे स्पष्ट आहे की भविष्यात चीनला या परिसरातून हटायचं नाही. भारतासोबत चर्चेच्या आडून चीन या भागातील सैन्याची स्थिती मजबूत करण्यावर भर देत आहे. ज्यामुळे भविष्यात या परिसरात चीन खराब वातावरणातही चांगल्या स्थितीत उभा राहील.
पेंगाँग सरोवराचे 'फिंगर्स' म्हणजे नेमकं आहे तरी काय?
१९९९ मध्ये कारगिल युद्ध सुरू असताना चीनने संधीचा फायदा घेत भारताच्या सीमेत सरोवाच्या काठावर 5 किलोमीटर लंबीचा रस्ता तयार केला होता. सरोवराच्या उत्तरेकडील काठावर काही पहाड आहेत. यांना स्थानिक भाषेत छांग छेनमो असेही म्हटले जाते. या टेकड्यांच्या उचलल्या गेलेल्या भागालाच लष्कर 'फिंगर्स', असे संबोधते. भारताचा दावा आहे, की एलएसीची सीमा फिंगर 8 पर्यंत आहे. मात्र ते फिंगर 4 पर्यंतच नियंत्रण ठेवतात.