India China Faceoff: "चिनी लष्कर नियंत्रण रेषेवर १८ किमी भारतात घुसले"
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 03:46 AM2020-06-27T03:46:33+5:302020-06-27T03:46:54+5:30
भारताच्या हद्दीत ना कोणी घुसखोरी केली आहे, ना जमिनीवर कोणी कब्जा केला आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता.
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : चीनच्या घुसखोरीवरून काँग्रेसने मोदी सरकारवरील हल्लाबोल आणखी तीव्र केला आहे. ‘स्पीक अप फॉर जवान’ या मोहिमेंतर्गत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ जारी करून म्हटले आहे की, देशाला सत्य ऐकायचे आहे. भारताच्या हद्दीत ना कोणी घुसखोरी केली आहे, ना जमिनीवर कोणी कब्जा केला आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता.
त्यावर राहुल गांधी यांनी सवाल उपस्थित केला आहे. उपग्रहाने काढलेली छायाचित्रे, लष्कराचे अधिकारी व लडाखच्या लोकांचे म्हणणे आहे की, चीनने तीन ठिकाणी आमच्या जमिनीवर कब्जा केला आहे. तुम्ही म्हणता आमची जमीन गेलेली नाही. परंतु खरेच जमीन गेलेली असेल तर चीनचा फायदा होईल. पंतप्रधानांना सत्य बोलावे लागेल व देशाला सांगावे लागेल की, सत्य काय आहे?
माजी संरक्षण राज्यमंत्री पल्लम राजू व जितेंद्र सिंह यांनी तर सरकारवर थेट आरोप केला आहे की, राष्टÑीय सुरक्षा व देशाच्या अखंडतेसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. चीनने भारतीय सीमेमध्ये १८ किलोमीटरपर्यंत नियंत्रण रेषेवर कब्जा केला आहे. चीनी सैन्य आता दर्बक- श्योक- दौलत बेग ओल्डी रोडपासून म्हणजेच लडाखच्या बर्टस गावापासून ७ किमी अंतरावर आहे. दौलत बेगच्या हवाईपट्टीपासून केवळ २५ किलोमीटरचे हे अंतर आहे. असे असले तरी मोदी म्हणतात की, भारतीय सीमेमध्ये कोणीही घुसखोरी केलेली नाही.
।सरकारवर टीकास्त्र
काँग्रेसने सुरू केलेल्या देशव्यापी आंदोलनांतर्गत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनीही सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
चीनच्या लष्कराने लडाख भागात ज्या जमिनीवर कब्जा केला आहे, ती जमीन मोदी सरकार कधी व कशी परत घेणार आहे, असा सवाल त्यांनी केला आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.