लडाख – भारत आणि चीन यांच्यात गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर आता काही प्रमाणात सीमेवरील तणाव कमी होताना दिसत आहे. वास्तविक नियंत्रण रेषा(LAC) वरुन दोन्ही देशाचे सैन्य मागे हटण्यास सुरुवात झाली आहे. ताज्या माहितीनुसार सैन्य हॉट स्प्रिंग परिसरातून २ किमी मागे हटलं आहे. आगामी काळात सीमेवरील तणाव आणखी सुधारण्यासाठी दोन्ही देशांमध्ये मुत्सदी आणि सैन्य पातळीवरील चर्चा सुरुच राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार गलवान खोऱ्यातील विवादीत जागेवरुन दोन्ही सैन्य मागे हटलं तरी आताही पैंगोंग लेक, डेपसांग परिसरात दोन्ही देशाचे सैन्य मागे हटलं नाही. भारतीय आणि चिनी सैनिक लडाख सेक्टरमधील गलवान खोरे, हॉट स्प्रिंग आणि गोगरा पोस्टमधून मागे हटले आहे. पैंगोग लेक आणि डेपसांग क्षेत्राबाबत गुरुवार शुक्रवार पर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे.
'इंडियन एक्सप्रेस' या इंग्रजी वृत्तपत्राने वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्याचा हवाला देत असा दावा केला आहे की, हॉट स्प्रिंग सेक्टरमधील पेट्रोलिंग पॉईंट १५ वरुन दोन्ही देशांचे सैन्य सुमारे २ किमी मागे गेले आहे. तिथे चीनकडून जे तंबू लावण्यात आले होते, चिनी सैन्याने त्यांना तेथून हटवले आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांदरम्यान झालेल्या कराराअंतर्गत माघार घेण्यावर सहमती झाली आहे. आज गुरुवारी सैन्याने तेथून पूर्णपणे माघार घेतली आहे की नाही याची पडताळणी केली जाईल.
दोन्ही सैन्य सध्या गोगरा भागात समोरासमोर उभे आहेत. परंतु पुढील एक-दोन दिवसांत सैन्य येथूनही माघार घेईल, अशी अपेक्षा आहे. यापूर्वी सोमवारी चिनी सैन्याने पूर्वेकडील लडाखमधील गलवान खोऱ्यातून माघार घेतली होती. दोन्ही देशांच्या सैन्याने हिंसक झटापटीच्या जागेपासून १.५ कि.मी. मागे गेले आहेत. आता यास बफर झोन बनविला गेला आहे, जेणेकरून यापुढे हिंसक घटना घडू नयेत.
सीमेवर 40 हजार सैनिक!
एका वरिष्ठ सैन्याधिकाऱ्याचा हवाला देत या वृत्तपत्राने दावा केला आहे की, सुमारे ४० हजार भारतीय सैनिक सध्या शस्त्रे आणि दारूगोळा घेऊन एलएसीवर तैनात आहेत. यातील सुमारे ४०० सैनिक मागे हटले आहेत. परंतु अशी आशा आहे की, संवादाच्या आणखी काही फेऱ्यानंतर दोन्ही बाजूंकडून सैन्याची ताकद कमी होईल. ६ जून रोजी कोअर कमांडरच्या बैठकीत दोन्ही बाजूंनी सहमती झाली. यानंतर ३० जून रोजी कोअर कमांडरच्या तृतीय स्तराच्या बैठकीत डिसेंजेजमेंटची चर्चा झाली होती.