India China Faceoff: ...म्हणून आता नरेंद्र मोदींनी देशाची माफी मागावी; चीनच्या माघारनंतर काँग्रेसने केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 08:11 PM2020-07-06T20:11:07+5:302020-07-06T20:11:34+5:30
चिनी सैन्य २ किलोमीटरपर्यंत माघारी गेलं आहे.
नवी दिल्ली: पूर्व लडाखच्या सीमेवर गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीन या देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. मात्र भारताकडून जशास तसं उत्तर मिळाल्यानं चीनच्या सैन्यानं आज माघार घेतली आहे. १५ जूनला गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्यात रक्तरंजित झटापट झाली. त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला. मात्र याच भागातून आता चिनी सैन्य २ किलोमीटरपर्यंत माघारी गेलं आहे. चिनी सैन्यनं माघार घेतल्यानंतर काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी एक गंभीर वक्तव्य केलं. 'भारतीय हद्दीत कुणीही घुसलेलं नाही. अतिक्रमण झालेलं नाही. आमची एकही चौकी दुसऱ्या कुणाच्या ताब्यात नाही', असं वक्तव्य केलं होतं. नरेंद्र मोदींच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसकडून निशाणा साधण्यात आला होता. त्यातच चिनी सैन्यानं माघार घेतल्यानंतर पुन्हा काँग्रेसनं पत्रकार परिषद घेऊन नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खेरा म्हणाले,"आमच्या शूर लष्करानं चिनी सैन्याला परतवून लावण्याचा प्रयत्न केला. आपल्याला लष्कराचा अभिमान आहे. आपल्या सैन्याच्या क्षमतेबद्दल कधीही शंका नव्हती. यापूर्वी सैन्यानं हे काम केलं होतं, मग तो पाकिस्तान असो की चीन. आपल्या सैन्याला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, अशं पवन खेरा यांनी सांगितले. तसेच नरेंद्र मोदींनी भारतीय हद्दीत कुणीही घुसलेलं नाही हे विधान अत्यंत दुर्दैवी असल्याचं पवन खेरा यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी यांनी भारतीय हद्दीत कुणीही घुसलेलं नाही, हे विधान केल्यानंतर दोन तासाच्या आत चीननं ते विधान भारताच्या पंतप्रधानांनी क्लिन चीट दिली म्हणून चालवण्यात आलं होतं. मात्र त्याचवेळी चीननं केलेल्या निवेदनात गलवान व्हॅलीवर ताबा सांगितला होता. त्यामुळे पंतप्रधानांसारखी व्यक्ती अशा शब्दांचा उल्लेख करते, ज्याचा चीनने क्लिन चीट म्हणून वापर केला. हे संपूर्ण जग पाहत होतं. यामुळे नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशातील जनतेची माफी मागायला हवी. हो मी चुकलो. मी तुमची दिशाभूल केली. किंवा मला वेगळे शब्द वापरायचे होते, पण मी चुकीचे बोललो, असं म्हणत नरेंद्र मोदींनी देशाची माफी मागावी, अशी मागणी पवन खेरा यांनी केली आहे.
Highlights of Press Briefing by Shri @Pawankhera
— INC Sandesh (@INCSandesh) July 6, 2020
(1/2) pic.twitter.com/MxUQ0M6EH7
दरम्यान, ३० जूनला दोन्ही देशांमध्ये कमांडर दर्जाची बैठक झाली. त्यानंतर चिनी सैन्य मागे हटलं की नाही, याची पडताळणी करण्यासाठी रविवारी एक सर्वेक्षण करण्यात आलं. 'गलवान खोऱ्यातील झटापट झालेल्या भागापासून चिनी सैन्य दोन किलोमीटर मागे घेतलं आहे. या भागात उभारण्यात आलेली तात्पुरत्या स्वरुपाची बांधकामं हटवण्याचं काम दोन्ही देशांच्या सैनिकांकडून सुरू आहे,' अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे.