नवी दिल्ली – पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात १५ जून रोजी झालेल्या चीनी आणि भारतीय सैनिकांच्या संघर्षानंतर देशात चीनविरोधात संतापाची लाट आहे. सोमवारी रात्री झालेल्या दोन्ही सैनिकांच्या झटापटीत देशाचे २० जवान शहीद झाले, या घटनेनंतर भारत आणि चीन सीमेवरील तणाव वाढला आहे. भारतीय सैनिकांना लोखंडाच्या रॉडने, दगडाने हल्ला करण्यात आला. एलएसीवर झालेल्या या हल्ल्यात भारताचे २० जवान शहीद झाले तर ७० हून अधिक जवान जखमी झालेत.
या प्रकरणात काँग्रेस नगरसेवक जाकीर हुसैन यांची एक ऑडिओ क्लीप व्हायरल होत आहे. यात ते म्हणतात की, चीनने जवळपास २०० भारतीय सैनिकांना मारलं आहे. त्यासोबत चीनी सैनिक भारताच्या १३५ किमी सीमेत घुसले आहेत. काँग्रेस नगरसेवकाच्या या ऑडिओ क्लीपनंतर लोकांमध्ये संतप्त भावना निर्माण झाली आहे. काँग्रेस नगरसेवकाच्या या ऑडिओ क्लीपनंतर भाजपाने काँग्रेसवर शहीदांचा अपमान करत आहेत असा आरोप केला आहे.
या ऑडिओ क्लीपची पुष्टी अद्याप कोणीही केली नाही पण ही व्हायरल क्लीप प्रचंड व्हायरल होत आहे. यानंतर पोलिसांनी काँग्रेस नगरसेवक जाकीर हुसैन यांना अटक केली आहे. टाईम्स नाऊ या इंग्रजी वृत्त वाहिनीने ही बातमी दिली आहे. ऑडिओ क्लीपमध्ये चायनाचे ब्लॅक कमांडो सैनिक या प्रदेशात आले आहेत, भारतीय जवानांना त्यांनी मारहाण करुन पाठवलं आहे. सरकार २० जवान शहीद झाले आहेत असं सांगतात पण अंदाजे २००-२५० जवान शहीद झाले आहेत, चीनचे जवान मृत्यू झाले नसून काही जखमी आहेत, भारत काही करणार नाही, चीन लेहचा अर्धा भाग ताब्यात घेईल असं या ऑडिओ क्लीपमध्ये ऐकायला मिळत आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीदांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असं राष्ट्राला सांगितले असून देशाची एकता, अखंडता आमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारत शांतता प्रस्थापित करु इच्छितो पण जर कोणी डिवचायचा प्रयत्न केला तर त्याला उत्तर देण्यास सक्षम आहे असा इशारा चीनला दिला आहे.
काय घडलं होतं?
सोमवारी सकाळी ब्रिगेड कमांडरसोबत स्थानिक कमांडर स्तरीय बैठक झाली. संध्याकाळी भारतीय लष्कारी अधिकाऱ्यांची टीम गलवान खोऱ्यात पीपी १४ याठिकाणी पोहचले ज्याठिकाणाहून चीनच्या सैनिकांना मागे जायचं होतं, भारतीय अधिकारी आणि त्यांच्या जवानांवर दगड आणि लोखंडाच्या रॉडने हल्ला केला. त्यामुळे भारतीय सैनिकांनीही सतर्कता बाळगत त्याला उत्तर दिलं. मोठ्या संख्येने भारताचे सैनिक त्याठिकाणी पोहचले, रात्री उशिरापर्यंत दोन्ही सैनिकात संघर्ष सुरु होता. यात घटनेत २० जवान शहीद झाले तर चीनच्या गंभीर जखमी पकडून साधारण ४३ सैनिकांचा मृत्यू झाल्याची बातमी मिळाली. या संघर्षामुळे चीनविरोधात भारतात संतप्त भावना आहे.