नवी दिल्ली : पूर्व लडाखला लागून असलेल्या सीमेवर चीनने मोठी जमवाजमव केली आहे. आणखी सैन्य तैनात करण्यासाठी चीनने पायाभूत सुविधा उभारल्या आहेत. ही चिंतेची बाब आहे, असे लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे शनिवारी म्हणाले. कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. स्थिती जाणून घेण्यासाठी लष्करप्रमुख सीमेवर गेले आहेत.
ऑगस्टच्या प्रारंभी पूर्व लडाखच्या सीमेवरील गोगरा येथून भारत व चीनने माघार घेतली. मात्र, त्यानंतरच्या दोन महिन्यांत चीनने सीमेवर अनेक हालचाली सुरू केल्या. लष्करप्रमुख म्हणाले की, सीमाप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी भारत पाठपुरावा करत आहे. सीमेवरून सैन्य मागे घेण्यासाठी दोन्ही देशांत पुढील आठवड्यात चर्चा होणार असून त्यातून समाधानकारक तोडगा निघेल.
चीनने सीमेवर सुरू केलेल्या हालचालींवर आमचे बारीक लक्ष आहे. भारतानेही अत्याधुनिक शस्त्रास्त्रे सीमेवर सज्ज ठेवली आहेत. भारतीय सेनादले अतिशय समर्थ असून आम्ही कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास तयार आहोत. - जनरल मनोज नरवणे, लष्करप्रमुख
के९-वज्र तोफा तैनातचीनला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने लडाखच्या सीमेवर ‘के९- वज्र’ या प्रकारातील तोफा तैनात केल्या आहेत. या तोफांमधून ५० किमी अंतरापर्यंत भेदक मारा करता येतो. डोंगराळ भागातही या तोफांचा अत्यंत प्रभावी वापर होतो. त्यामुळे या तोफांचा समावेश लष्कराच्या सर्व रेजिमेंटमध्ये करण्यात आला आहे.