नवी दिल्ली : चीनने गेल्या आठवड्यात उत्तर सिक्कीममधील नाकु ला येथे घुसखोरी करण्याचे रचलेले कारस्थान शूर भारतीय जवानांनी हाणून पाडले आहे. यावेळी झालेल्या चकमकीत २० चिनी सैनिक व चार भारतीय जवान जखमी झाले. परिस्थिती लष्कराने नियंत्रणात आणली आहे.
यासंदर्भात भारतीय लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, नाकुला येथे २० जानेवारी रोजी चिनी सैनिकांनी सीमा ओलांडून भारतीय हद्दीत येण्याचा प्रयत्न करताच त्याला जवानांनी जोरदार विरोध केला. त्यांच्यात चकमकही झाली. हिवाळ्यात सिक्कीमसह काही राज्यांचा इतर देशांना लागून असलेला सीमाभाग हिमाच्छादित असतो. उत्तर सिक्कीममधील नाकु ला हा परिसर अतिशय दुर्गम असून तिथे व अशा सर्वच ठिकाणी भारतीय सैनिक कडक थंडीची पर्वा न करता अहोरात्र सीमेचे रक्षण करत आहेत. पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात १५ जूनला चीनच्या सैनिकांबरोबर गेल्या जोरदार चकमक झाली होती. त्यात २०हून जास्त भारतीय जवान शहीद झाले होते.