लेह : चीनने लडाखच्या सीमेवर चालविलेल्या कारवाया लक्षात घेता भारतीय लष्करानेही कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यासाठी मोठी पूर्वतयारी केली आहे. लडाखच्या सीमेवर तैनात भारतीय सैन्याला रसद पुरविण्याची कामगिरी सी-१७ ग्लोबमास्टर या विमानासह अन्य विमाने, हेलिकॉप्टर पार पाडत आहेत.
अतिशय उंचावर असलेल्या लेह हवाई तळावर सी-१७ ग्लोबमास्टर हे विमान उतरत असतानाचा एक व्हिडिओ सर्वत्र झळकला आहे. मोठ्या आकाराची संरक्षण उपकरणे, शस्त्रास्त्रे यांच्यापासून ते मोठ्या संख्येने सैनिक, अन्नधान्य व इतर गोष्टी यांची वाहतूक या विमानातून करता येते. सीमेच्या सर्वात जवळ असलेल्या चौक्यांमध्ये तैनात असणाऱ्या जवानांसह सर्व सैन्यालाच आवश्यक गोष्टींचा अखंड पुरवठा होत राहणे आवश्यक असते. युद्धाच्या प्रसंगात तर अशा रसदीचे महत्त्व अनन्यसाधारण असते. पूर्व लडाखमधील गलवान खोºयात चिनी सैनिकांनी केलेला घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडताना झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते. तेव्हापासून चीनबद्दल भारतात संतापाची भावना आहे. चीनने लडाख सीमेवर मोठे सैन्य जमा केले आहे. हे लक्षात घेता भारतीय लष्करानेसुद्धा कोणत्याही आव्हानांना तोंड देण्यासाठी पूर्वतयारी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सी-१७ ग्लोबमास्टर विमानाद्वारे सैन्याला पुरविण्यात येणाºया रसदीत वाढ केली आहे.लष्करप्रमुखांचे सीमेवरील स्थितीवर बारीक लक्षमॅकडोनल डग्लस या कंपनीने सी-१७ हे विमान अमेरिकी लष्करासाठी १९८० च्या दशकात तयार केले होते. या विमानाचा भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातही समावेश करण्यात आला आहे. सी-१७ ग्लोबमास्टर विमानातून रणगाडे, दारूगोळा, इंधन, अन्नधान्य, हिवाळ्यामध्ये लागणारे तंबू, गरम कपडे, अशा गोष्टींचा पुरवठा लडाख सीमेवरील भारतीय सैनिकांना केला जात आहे. सीमेवरील स्थितीपासून सर्व गोष्टींवर लष्करप्रमुख मनोज नरवणे हे स्वत: जातीने लक्ष ठेवून आहेत. वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी हवाई दलातील हेलिकॉप्टर, तसेच सी-१३० जे सुपर हर्क्युलससह अन्य विमानांचा लडाखमध्ये रसद पोहोचविण्यासाठी वापर केला जात आहे.