नवी दिल्ली: उन्हाळ्यापासून सुरू असलेला पूर्व लडाखमधील तणाव आजही कायम आहे. आता थंडीच्या दिवसात पारा घसरणार असल्यानं लडाखमध्ये तग धरणं दिवसागणिक अवघड होत जाणार आहे. त्यामुळे हिवाळ्यासाठी भारतीय लष्करानं विशेष तयारी केली आहे. पूर्व लडाखमध्ये दरवर्षी ४० फूट बर्फ पडतो. याशिवाय तापमान उणे ३० ते ४० अंशांपर्यंत घसरतं. त्यामुळे हिवाळ्यात चिनी सैन्याच्या आगळिकींचा सामना करण्यासाठी भारतीय जवान सज्ज झाले आहेत.हिवाळ्यात पूर्व लडाखमध्ये मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होते. पारा प्रचंड घसरत असल्यानं या भागात तग धरून राहणं अतिशय आव्हानात्मक असतं. चीननं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ रस्त्यांची कामं सुरू केली आहेत. त्यामुळे हिवाळ्यात सीमावर्ती भागातील वातावरण तापण्याची चिन्हं आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याच्या मुक्कामासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जवानांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यादृष्टीनं पूर्ण तयारी करण्यात आली आहे.
लडाखमध्ये अत्याधुनिक सुविधा; कडाक्याच्या थंडीत चीनला घाम फोडण्यास जवान सज्ज
By कुणाल गवाणकर | Published: November 18, 2020 4:46 PM